प्राथमिक सोयी नसलेले गाव
By Admin | Published: May 15, 2016 01:12 AM2016-05-15T01:12:42+5:302016-05-15T01:12:42+5:30
राहायला पक्के घर नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही आणि पोटाला अन्न नाही, अशी अवस्था असलेल्या गावात सरकारने १४.७५ लाख रुपये मोजून समाजभवन उभारले आहे.
हितेन नाईक, पालघर
राहायला पक्के घर नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही आणि पोटाला अन्न नाही, अशी अवस्था असलेल्या गावात सरकारने १४.७५ लाख रुपये मोजून समाजभवन उभारले आहे. गोरगरिबांना चिडवणारे हे चित्र आहे, खोडाळ्यातील कातकरीपाड्याचे. या गावात आदिवासी-कातकरी समाजाची इनमीन ५० घरे असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गावातील सर्व पुरुष मंडळी शहराकडे असतात.
पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी मोखाडा, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांत ९५ टक्के आदिवासी लोकवस्ती आहे. आदिवासींना केंद्रबिंदू मानून नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली असताना जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला असताना सर्वसामान्यांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास सुरुवात झाली आहे काय, हे पाहिल्यास नाही, असे काहीसे खेदाने म्हणावे लागेल. असे चित्र मोखाडा-खोडाळामधील ग्रामीण भागात दिसून आले.
खोडाळा येथील कातकरीपाड्यातील झोपड्यांमध्ये राहणारे कातकरी समाजबांधव आजही जगण्याचा संषर्घ करीत आहेत. प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुख व त्याची पत्नी आपल्या मुलांना म्हाताऱ्या आईवडिलांकडे सोपवून रोजगाराच्या शोधार्थ भिवंडी, वाडा, ठाणे, पालघर इ. भागांत ४ ते ५ महिने राहतात. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील अंगणवाडी नावाला असल्याचे दिसून येते. पिण्याचे पाणी स्वच्छतेच्या कसोटीवर नापास असून आरोग्याच्या सुविधांचा अभावही येथे प्रकर्षाने जाणवतो. या पाड्यातील ८० टक्के घरे ही चंद्रमौळी झोपड्या असल्याने त्यांच्या गरिबीची साक्ष देत असल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना जीवनोपयोगी सुविधा देणे गरजेचे असताना आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा योजनेतून १४ लाख ७५ हजारांचे समाजभवन उभारण्यात आले. जे या पाड्यातील नागरिकांच्या काही उपयोगाचे नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासन आदिवासी समाजाच्या विकासासाठी नियोजित केलेल्या निधीचा योग्य विनियोग करीत नसल्याचे दिसून येत आहे.