खाडीतील अतिक्रमणांविरोधात ग्रामस्थ झाले आक्रमक; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:34 AM2020-02-05T00:34:09+5:302020-02-05T00:35:56+5:30
समुद्र किनाऱ्याला लागून उत्तन नाकापासून पालीपर्यंतची नवीखाडी व पात्र परिसरात दाट कांदळवन आहे.
मीरा रोड : भाईंदर उत्तन ते पाली दरम्यान समुद्राजवळच्या नवीखाडी तसेच कांदळवनात झालेला भराव, अतिक्रमण, कचरा - गाळ काढून भरतीचा प्रवाह मोकळा करा तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोनशेपेक्षा जास्त ग्रामस्थांनी सह्या करुन सोमवारी महापालिका आयुक्त, अपर तहसीलदार, स्थानिक नगरसेवकांनी निवेदन दिले आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
समुद्र किनाऱ्याला लागून उत्तन नाकापासून पालीपर्यंतची नवीखाडी व पात्र परिसरात दाट कांदळवन आहे. परंतु समुद्राकडील खाडीचे तोंड भरावामुळे बंद झाले आहे. त्यातच खाडीत भराव, बांधकामांमुळे भरतीचे पाणीही आतपर्यंत येत नाही. कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो. खाडीत प्रक्रिया न करताच सांडपाणी राजरोस सोडले जाते. त्यामुळे खाडीत कचरा व गाळ साचून पाण्याचा प्रवाह व निचरा बंद झालेला आहे. खाडीत सांडपाणी साचून राहात असल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
उत्तन नाकापासून पालीपर्यंतच्या सरकारी जागेतील या नवीखाडी पात्रात अगदी महापालिकेसह भूमाफियांनी भराव करून बेकायदा गाळे, स्वच्छतागृह, बंगले आदी बांधकामे केली आहेत. अनेकांनी भराव करून जागा अडवून ठेवलेल्या आहेत. भराव व बांधकामे करताना येथील कांदळवनाच्या झाडांची कत्तल केली असून या प्रकरणी पूर्वी महसूल विभागाने काही जणांवर गुन्हे दाखल केले होते. पण अजून एकही बांधकाम तोडलेले नाही वा भराव काढला गेला नाही. नव्याने येथे भराव तसेच कांदळवनची झाडे सुकून मारण्यात आल्या प्रकरणीही ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत.