अलोंड्यातील मांत्रिकाविरोधात ग्रामस्थ पोलिसांत
By Admin | Published: August 9, 2015 11:07 PM2015-08-09T23:07:45+5:302015-08-09T23:07:45+5:30
आलोंडे (वडपाडा) येथे अंधश्रद्धा पसरवून भूतबाधा व असाध्य रोगावर उपचार केल्याचा दावा करून गावात अशांतता पसरविणारा भोंदू मांत्रिक किसन रामा लहांगे व त्याच्या साथीदारांवर
हितेन नाईक, पालघर
आलोंडे (वडपाडा) येथे अंधश्रद्धा पसरवून भूतबाधा व असाध्य रोगावर उपचार केल्याचा दावा करून गावात अशांतता पसरविणारा भोंदू मांत्रिक किसन रामा लहांगे व त्याच्या साथीदारांवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
वाडा तालुक्यातील असनस, कळंभई या गावांतील किसन रामा लहांगे (बाबा) आणि त्याच्या पत्नीने आलोंडे (वडपाडा) गावाबाहेर एक झोपडी बांधून बुवाबाजीचे दुकान थाटले आहे. त्यांनी गावातील विजय रुपजी दळवी, बच्चू रुपजी दळवी, विनोद रुपजी दळवी, सुरेश रुपजी दळवी इ. पाड्यातील लोकांना हाताशी धरून लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करून मनात भीती निर्माण करून पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे स्थानिकांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. किसन लहांगे हे मंत्रतंत्राद्वारे भूतपिशाच्चांनाही आवाहन केल्याचा आभास निर्माण करून अघोरी कृत्ये करण्यास भाग पाडून अनेक आजार व घरातील भूतपिशाच्चांचा बंदोबस्त करण्याचा दावा करीत असल्याचे अलोंडे येथील रहिवासी सुरेश पा. कोती यांनी लोकमतला सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायदा २०१३ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांचे बुवाबाजीचे दुकान बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विक्रमगड तालुक्यातील साखरे येथील ग्रामस्थांनी जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबांचे दुकान बंद केल्यानंतर अशा समाजविघातक प्रवृत्तीच्या विरोधात आदिवासी समाज उठाव करू लागला आहे.