कोरोनावर विजय मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले स्वत:लाच कोंडून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 02:02 AM2020-04-28T02:02:55+5:302020-04-28T02:03:13+5:30
तहसीलदार सुनील शिंदे यांनी तालुक्यातील बोईसरमध्ये ३४ वर्षीय बाधित रुग्ण सापडल्याने बोईसरसह अन्य १४ गावे यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.
पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गाचा प्रभाव हळूहळू वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर सातपाटी, नवापूर, सरावली या गावांतील ग्रामस्थांनी स्वत:ला ४ ते ५ दिवस कोंडून घेण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे. तहसीलदार सुनील शिंदे यांनी तालुक्यातील बोईसरमध्ये ३४ वर्षीय बाधित रुग्ण सापडल्याने बोईसरसह अन्य १४ गावे यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.
वाढता प्रादुर्भाव रोखला जावा, यासाठी तहसीलदार शिंदे यांनी सफाळेसह उसरणी, दांडा-खटाळी, डोंगरी व उंबरपाडा, कर्दळ आदी सहा गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. सध्या संबंधित गावांवर आपल्या आरोग्य टीमसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी लक्ष ठेवून आहेत.
सातपाटी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर या संशयित रुग्णाच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. या पार्श्वभूमीवर सरपंच व ग्रामसेवकांनी २८ ते ३० एप्रिलपर्यंत सातपाटी गाव कडकडीत बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
यापूर्वी तालुक्यातील मासवणजवळील काटाळे येथील एका विटभट्टीवर डहाणूच्या गंजाडमधील कामावर असलेल्या कुटुंबातील एक तीन वर्षीय मुलगी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार शिंदे यांनी काटाळे, लोवरे, वसरोली, वांदिवली, खरशेत, निहे, मासवण, वाकडी ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली होती. तर सफाळे (उसरणी) येथे तालुक्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नीसह मुलगी, आई-वडील अन्य नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. यानंतर १५ एप्रिल रोजी सफाळ्याच्या कर्दळ जवळील एक तरुण, उसरणी येथून ११ वर्षीय मुलगी व ४० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.
>तीन ते पाच दिवसांसाठी गावे बंद
बोईसरमध्ये एका ३४ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने २७ एप्रिल ते १ मे पर्यंत बोईसर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीने घोषित केले आहे. तहसीलदार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण बोईसर हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर लगतच्या सरावली व नवापूर ग्रामपंचायतींनी आपली गावे तीन ते पाच दिवसांसाठी बंद घोषित करीत कोरोनाला हरविण्यासाठी स्वत:ला घरातच कोंडून घेण्याचा निर्णय घेतला.