रुंदे पूल पाण्याखाली गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 05:00 AM2017-08-28T05:00:44+5:302017-08-28T05:00:57+5:30
एकीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना, शुक्रवारी जोरदार पावसाने टिटवाळ्यानजीकच्या रुंदेजवळील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे आठ ते १० गावांचा शहराशी संपर्क तुटला
टिटवाळा : एकीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना, शुक्रवारी जोरदार पावसाने टिटवाळ्यानजीकच्या रुंदेजवळील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे आठ ते १० गावांचा शहराशी संपर्क तुटला.
सकाळी उत्साहात गणरायाचे आगमन झाले. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने सायंकाळी ५ वाजल्यानंतर काळू नदीवरील रुंदे येथील पूल पाण्याखाली गेला. पुराच्या पाण्यामुळे पुलावरील काँक्रिटचा थरही वाहून गेला आहे. पुरामुळे फळेगाव, उशीद, मढ, हाल, रुंदे, पळसोली, आरेला, आंबिवली, भोंगाळपाडा व काकडपाडा या गावांचा संपर्क तुटला. यामुळे गणेशभक्त व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली. पावसाचा जोरही वाढल्याने गणेशभक्तांना घराबाहेर पडणे कठीण झाले. पाहुणे मंडळी, नातलग व मित्रांचा हिरमोड झाला. दरम्यान, शनिवारी कल्याणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ उपाययोजना म्हणून पुलावर ग्रीट टाकून वाहतूक तात्पुरती सुरू केली.