वसईतील बिसन पेट्रोल पंपावर भीषण राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:05 AM2020-09-20T01:05:49+5:302020-09-20T01:05:55+5:30
मास्क घालायला सांगितल्याचा रागातून तोडफोड : माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई पश्चिमेस माणिकपूर नाक्यावर बिसन पेट्रोल पंपावर भीषण राडा झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडल्याचे उघडकीस आले आहे. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणांनी मास्क घातलेले नसल्यामुळे पेट्रोल देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार देताच संतप्त झालेल्या तरुणांनी या पेट्रोल पंपावर तोडफोड केली. या प्रकरणी माणिकपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसईतील माणिकपूर येथील बिसन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी विनामास्क आलेल्या काही तरुणांनी येथील पंपाची अक्षरश: तोडफोड करत एका महिला कर्मचºयासह अन्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली. शुक्र वारी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास नालासोपारा येथे राहणारे १० ते १२ तरुण दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले. त्यांनी मास्क न लावल्याने पंपावरील कर्मचाºयांनी त्यांना पेट्रोल देण्यास नकार दिला. बाजूला जा असे सांगितले असता त्या तरुणांनी पंपावर तुफान राडा घातला. कर्मचाºयांना मारहाण करून पंपावरील सामानाची आणि फिलिंग मशीनची तोडफोड केली गेली.
सीसीटीव्ही फूटेजवरून नऊ आरोपींची नावे समजली
या प्रकरणी ९ आरोपी तरुणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी वसई, नालासोपारा, विरार आदी ठिकाणी चार टीम पाठवल्या असल्याची माहिती माणिकपूर पोलिसांनी दिली. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेºयात हा प्रकार कैद झाला असून त्या वेळी नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यात दोन-तीन पोलीस कर्मचारीही या वेळी हजर होते, मात्र त्यांनी हस्तक्षेप केला नाही, यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.