पोलिसांच्या हप्तेखोरीची क्लिप व्हायरल
By Admin | Published: April 11, 2017 02:06 AM2017-04-11T02:06:54+5:302017-04-11T02:06:54+5:30
वाहतूक पोलीस दरमहा किमान पन्नास लाखाचा हप्ता वसुल करीत असल्याची बातमी लोकमतने सविस्तरपणे प्रसिद्ध केली होती. वालीव येथील एक वाहतूक पोलीस चक्क
- शशी करपे, वसई
वाहतूक पोलीस दरमहा किमान पन्नास लाखाचा हप्ता वसुल करीत असल्याची बातमी लोकमतने सविस्तरपणे प्रसिद्ध केली होती. वालीव येथील एक वाहतूक पोलीस चक्क एका राजकीय नेत्याकडे हप्त्याची मागणी करीत असल्याचे संभाषण व्हायरल झाल्याने या बातमीला दुजोरा मिळाला आहे. तसेच बेकायदा वाहतूकीला प्रोत्साहन देण्यासाठी वाहतूक पोलीस करीत असलेली लुटमार चव्हाट्यावर आली आहे.
वसई पूर्वेकडील वालीव, सातीवली, भोयदापाडा आदी औद्योगिक क्षेत्रात पदाचा गैरवापर करून वाहतूक पोलीस नारायण चौगुले हप्तेखोरी करीत असल्याचाआरोप वडार समाजाचे नेते आणि बहुजन विकास आघाडीच्या विमुक्त भटका समाज आघाडीचे अध्यक्ष वामन शेळके यांनी केला आहे. नारायण चौघुले आणि वामन शेळके यांच्या हप्त्यासाठी झालेल्या संभाषणाची ध्वनीफित (ही ध्वनीफित लोकमतच्याही हाती लागली आहे) शेळके यांनी व्हायरल केली आहे. या संवादात चौगुले असंसदीय शब्दप्रयोग करून चक्क शेळके यांच्याकड हप्त्याची मागणी करीत असल्याचे ऐकू येते.
धक्कादायक बाब म्हणजे शेळके पाचशे रुपये पाठवतो असे सांगत असताना चौगुले मात्र हजार रुपये आणि दरमहा हप्ता द्यायला सांगा असेही सुनावत असताना ऐकू येते.
दोन महिन्यांपूर्वीच वाहतूक पोलीस बेकायदा रिक्शा, मॅजिक रिक्शा, सहा आसनी रिक्शा, टेम्पो, स्कूल बस, खाजगी बस, पाण्याचे टँकर, रेतीचे ट्रक यांच्यासह विविध वाहन चालकांकडून महिन्याला तब्बल पन्नास लाखांहून अधिक हप्ता गोळा करीत असल्याची यादीही दिली होती. शेळके यांच्यासारख्या राजकीय नेत्यांनाही हजार रुपयांसाठी वाहतूक पोलीस कशा पद्धतीने अडवणूक करीत असतात हे उजेडात आल्यानंतर त्यांच्या हप्तेबाजीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान, वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी नियंत्रित करण्याऐवजी आडमार्गावर उभे राहून मोटार सायकली आणि माल वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे वसई विरार परिसरात पहावयास मिळते. रिक्शाचालक हप्ते देत असल्याने त्यांना मोकळीक असते.
‘आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात’
वालीव भागातील एका चारचाकी गाडी चालकावर चौगुले यांनी कारवाई केली होती. याप्रकरणात चालकासाठी शेळके यांनी चौगुलेंना मोबाईलवरू न संपर्क साधला होता. यावेळी हप्त्याचे एक हजार रुपये थकीत असल्याचे सांगत आपल्याला नियमित पैसे दिल जात नसल्याने कारवाई केल्याचेही चौगुले अगदी निर्लज्जपणे शेळके यांना सांगत असताना ऐकू येते. इतकेच नाही तर आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात. त्यामुळे या छोट्याशी गोष्टीत आपण लक्ष घालू नका, असा सल्लाही चौगुले देत असल्याचे ऐकू येते.