Virar Covid hospital Fire: रुग्ण गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 05:10 AM2021-04-24T05:10:51+5:302021-04-24T05:11:10+5:30
Virar Covid center Fire: स्फोटाने जागे झाले, परंतु स्वत:चे जीव वाचवू शकले नाहीत, नातेवाईकांच्या सूचनेकडे रुग्णालयाचे दुर्लक्ष
- आशिष राणे
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई (पालघर) : विरारमधील विजय
वल्लभ रुग्णालयात रात्री सव्वातीनच्या सुमारास एसी काॅम्प्रेसरचा स्फोट होऊन आग लागली तेव्हा तेथे दाखल असलेले रुग्ण गाढ झोपेत होते. अचानक झालेल्या स्फोटाच्या आवाजाने रुग्ण जागे झाले खरे; परंतु त्यांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर लावलेले असल्याने ते जणू जखडल्यागत झाले होते. त्यामुळे त्यांना कसलीही हालचाल करता येत नव्हती. त्यामुळे असहायतेतून त्यांचा जीव गेला. उपस्थित स्टाफपैकी काहींनी मदत केल्याने त्यातील चार रुग्णांचा जीव वाचवण्यात यश आले. मात्र, १३ रुग्णांवर या काळरात्री काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये कर्तव्यावरील नर्स, तसेच डॉक्टर त्यावेळी उपस्थित नव्हते, असा धक्कादायक आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. मुळात रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये सेंट्रल एसी यंत्रणा कार्यरत होती. मात्र, त्यातून मागील दोन दिवसांपासून थंडावा येत नव्हता. गरम वाफा यायच्या. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनास आयसीयूचे कूलिंग चेक करा, असे नातेवाईक वारंवार सांगत होते. परंतु नर्स आणि कर्मचारी व त्यांचे रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. वेळीच या एसीच्या तांत्रिक समस्येची दखल घेतली गेली असती तर ही घटनाच घडली नसती, असा आरोप नातेवाईक करीत आहेत.
रात्री ज्यावेळी कॉम्प्रेसरचा स्फोट झाला आणि आगीची तीव्रता वाढून रुग्णांपर्यंत आग पोहोचली, त्यावेळी आयसीयूमध्ये नर्स व डॉक्टर कोणीही नव्हते. इतर सर्वजण गाढ झोपेत होते. त्यात १७ पैकी १३ जण हे ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर असल्याने त्यांना स्वतःहून बाहेर पडता आलेच नाही.
दोन तासांनंतर उरला कोळसा, काळा धूर
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आले. त्यांनी अथक प्रयत्नाने सुमारे दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. तोवर संपूर्ण खेळ खल्लास झाला होता. तेथे फक्त कोळसा आणि काळा धूरच उरला होता.
चेहरा पाहिल्यावरच घेतले मृतदेह
विरार : विजय वल्लभ रुग्णालयातील अग्नितांडवात मृत रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेत ठेवण्यात येत असतानाच रुग्णाच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट झाला.
nजोपर्यंत मृताचा चेहरा दाखविणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.
nत्यामुळे रुग्णालय, पालिका आणि पोलीस प्रशासनाला मृतांच्या नातेवाईकांची ही अट मान्य करावी लागली. पोलीस आणि माध्यम प्रतिनिधींवरही नातेवाईकांनी रोष व्यक्त केला.
माझ्या शेजारची व्यक्ती इथे उपचार घेत होती. त्यांनी मला ३.१५ च्या सुमारास फोन केला आणि माहिती दिली. कदाचित शिफ्टिंग करावे लागेल म्हणाले. मी आलो तेव्हा हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. त्यावेळी हॉस्पिटलकडून ॲम्ब्युलन्स मागविण्यात आल्या होत्या. तिसऱ्या आणि पहिल्या मजल्यावरील रुग्णांना हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजातून अन्यत्र हलविले जात होते. - प्रियदर्शन बोंडाळे, प्रत्यक्षदर्शी
एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. या दुर्घटनेत १३ जण मृत्यूमुखी पडले. इतर अन्य रुग्णांना वसई व दहिसर येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही दुसरीकडे हलविण्यात येणार आहे.
- दिलीप शाह, संचालक,
विजय वल्लभ हॉस्पिटल, विरार
या दुर्दैवी घटनेसंदर्भातील चौकशी समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमली असून, त्या समितीने केलेल्या शिफारशी अमलात आणल्या जातील. अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी प्रशासन नियोजनबद्ध काम करेल.
- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री.
दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या हॉस्पिटलमध्ये ७९ रुग्ण उपचार घेत होते. दुसऱ्या मजल्यावर आग लागली तेव्हा आयसीयू विभागात १७ रुग्ण होते. त्यातील १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
- दादाजी भुसे, पालकमंत्री
घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे. त्यामुळे यात ज्यांनी निष्काळजी किंवा बेजबाबदारपणा दाखविला असेल त्यांना पाठीशी घातले जाणार नाही.
- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री.