विरार-डहाणू रेल्वेचा होणार कायापालट
By admin | Published: January 26, 2017 02:55 AM2017-01-26T02:55:39+5:302017-01-26T02:55:39+5:30
पश्चिम रेल्वेच्या 3 हजार ५५२ कोटी खर्चाच्या एमयूटीपी ३ प्रकल्पांतर्गत विरार-डहाणू दरम्यान येत्या चार पाच वर्षात चौपदीकरणाद्वारे मोठे जाळे उभारले
हितेन नाईक / पालघर
पश्चिम रेल्वेच्या 3 हजार ५५२ कोटी खर्चाच्या एमयूटीपी ३ प्रकल्पांतर्गत विरार-डहाणू दरम्यान येत्या चार पाच वर्षात चौपदीकरणाद्वारे मोठे जाळे उभारले जाणार असून या रेल्वेचा कायापालट होणार आहे. यावेळी सद्यस्थितीतील रेल्वे ट्रॅकच्या पूर्वेकडून मालवाहतूक प्रकल्प तर पश्चिमेकडून चौपदीकरण होणार असल्याने त्या आड येणाऱ्या पालघर ते वाणगाव दरम्यानच्या स्टेशनाजवळील रेल्वेच्या अनेक जुन्या, नवीन इमारती जमीनदोस्त होणार आहेत.
एमयूटीपी अंतर्गत विविध प्रकल्पात मंजुरी मिळाल्याची घोषणा अलीकडेच करण्यात आल्यानंतर एमयूटीपी ३ अंतर्गत विरार डहाणू चौपदीकरण करण्यासंबंधीचा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. यासाठी एका खाजगी कंपनीला ह्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी व अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार या कंपनीने विरार ते डहाणू दरम्यानच्या प्रवाशांची (अप-डाऊन) सध्याची संख्या व त्यात पुढील ३० वर्षात होणारी वाढ, या विविध भागात होणारे शहरीकरण, औद्योगिकरण याचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. या प्रकल्पातंर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा करतांना विरार-डहाणू दरम्यानच्या प्रवाशांसाठी सन २०२१ पर्यंत दर १२ मिनिटाला एक लोकल अशी सेवा उपलब्ध राहणार आहे. सन २०३१ मध्ये ६ मिनिटाला एक लोकल, सन २०१४ मध्ये दर ४ मिनिटाला एक लोकल प्रवाशाच्या दिमतीला देण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. याच वेळी ९० हजार कोटी खर्चाची मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ही याच मार्गावरून धावणार आहे. प्रवाशांना जादा लोकलच्या फेऱ्या बरोबरच वैतरणा-डहाणू दरम्यानच्या ९ स्थानकांच्या जोडीला वाढीव, सरतोंडी, माकूणसार, चिंतूपाडा, खराळे रोड, पंचाळी, वंजारवाडा, बीएसई एस कॉलनी अशी आठ नवीन स्थानके निर्माण करण्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. ६४ किलोमीटरच्या या पट्ट्यात नवनवीन गृहसंकुले औद्योगिक प्रकल्प, पालघर जिल्हा कार्यालये उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने ही नवीन स्थानके कुठे असावीत हेही सुचविण्यात आली आहेत, असे जरी असले तरी ही स्थानके उभारण्यासाठीचा खर्च मात्र या प्रकल्पांत अंतर्भूत नाही. स्टेशन परिसरात करण्यात येणाऱ्या बदला बाबत सन २०१२ साली रेल्वे प्रशासनाने नेमलेल्या समितीद्वारा विरार ते डहाणू दरम्यानच्या परिस्थिीतीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्यात आलेला आहे. (प्रतिनिधी)