विरार-डहाणू रोड, डहाणू रोड-बोरीवली, वल्साड, सांजन-विरार गाड्या रद्द कराव्या लागल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 08:46 AM2024-05-29T08:46:37+5:302024-05-29T08:47:30+5:30

पालघर स्थानकात मालगाडी घसरली

Virar-Dahanu Road, Dahanu Road-Borivali, Valsad, Sanjan-Virar trains had to be cancelled! | विरार-डहाणू रोड, डहाणू रोड-बोरीवली, वल्साड, सांजन-विरार गाड्या रद्द कराव्या लागल्या!

विरार-डहाणू रोड, डहाणू रोड-बोरीवली, वल्साड, सांजन-विरार गाड्या रद्द कराव्या लागल्या!

हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर: पश्चिम रेल्वेच्यापालघर स्थानकाजवळ गुजरातकडून मुंबईकडे जाणारी मालगाडी मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता रूळ तुटल्याने घसरली. काही डबे पुढे निघून गेल्यानंतर अचानक रूळ तुटला. परिणामी शेवटचे काही डबे घसरले. या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली तरी,  पश्चिम रेल्वेची संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातात रेल्वे स्थानकावरील दोन नंबर ट्रॅकचे रुळ पूर्णपणे तुटल्याने तसेच तीन नंबर ट्रॅकवर मालगाडीचे डबे आणि त्यातील लोखंडी कॉईल पडल्याने दोन आणि तीन नंबर ट्रॅकवरून संपूर्ण सेवा बंद पडली. ओव्हर हेड वायर, खांब तुटल्याने दुरुस्तीला वेळ लागू शकतो, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ही मालगाडी पालघर रेल्वे स्थानकात दोन नंबर प्लॅटफॉर्मवर येत असतानाच प्लॅटफॉर्मच्या गुजरात बाजूकडील ११७ पॉईंटवरून गाडी घसरण्यास सुरुवात झाली. या पॉईंटवरील रेल्वे रूळ तुटल्याने मालगाडी कलंडली. त्यात असलेल्या लोखंडी कॉईलसह डबे दोन आणि तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मआधीच खाली कोसळले. हे डबे आणि कॉईल प्लॅटफॉर्मवर कोसळले असते तर मुंबईकडे जाण्यासाठी लोकलची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना अपघात होऊन मोठी जीवितहानी घडली असती.

  या अपघातामुळे दोन नंबरचा रेल्वे ट्रॅक अनेक ठिकाणी उखडला असल्याने दोन नंबरवरून होणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली, तर तीन नंबर ट्रॅकवर मालगाडीचे डबे आणि काईल पडल्याने तीन नंबर ट्रॅकही बंद पडला. 
 झालेली दुर्घटना पाहता मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात २४ तासांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 अपघातानंतर सव्वादोन तासानंतर बांद्रावरून सेल्फ प्रोपेल्ड ऑक्सिलरी टूल व्हॅनसह मदतीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी हजर झाली.

पालघर स्थानकात मालगाडी घसरली

  • विरार - डहाणू रोड मेमू, डहाणू रोड - बोरीवली मेमू, बोरीवली - वल्साड मेमू आणि सांजन - विरार मेमू या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • ६ अप आणि ५ डाऊन डहाणू लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. एक डाऊन डहाणू लोकल विरारपर्यंत चालविण्यात आली.
  • रेल्वे प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐन पीक अवरला म्हणजे सायंकाळी डहाणू विरार लाईन दोन तासांपासून बंद होती. अनेक प्रवाशांचा खोळंंबा झाला होता. बोईसरच्या पुढे एक तास गाडी थांबाली होती. ऐन सायंकाळी अडचण निर्माण झाल्याने लोकल प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते.  कुठलीही व्यवस्था नसल्याने प्रवाशांनी एसटी किंवा खासगी वाहनांचा वापर करावा, असे सांगण्यात येत होते.


एसटी बसेसची व्यवस्था

  घटनस्थळी पोलिस उपस्थि अल तरी ही सेवा सुरळीत होण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून दीड तास उलटून गेल्यानंतरही पर्यायी कुठलीही व्यवस्था करण्यात न आल्याने प्रवाशांना मिळेल त्या वाहनांचा आसरा घेत प्रवास करावा लागला. 
 डहाणूकडे जाणाऱ्या सर्व लोकल अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आल्याच्या घोषणाही यावेळी करण्यात आल्या. 
 एसटी विभागाचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नालासोपारा, केळवे, बोईसर दिशेने जाणाऱ्या बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पालघरचे पोलिस निरीक्षक अनंत पराड आदींनी घटनास्थळाला भेट दिली.

वाहतूक पूर्णतः बंद

 मुंबई आणि गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः बंद पडल्यानंतर तब्बल दोन तासांनंतर घोषणा करण्यात आल्या. 
 विरारच्या दिशेने जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने प्रवाशांनी एसटी किंवा खासगी वाहनांचा वापर करावा, असे सांगण्यात येत होते.

गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांची व्यवस्था

  दोन तासाने सुरतकडे जाणाऱ्या विरार-सुरत शटलला ६:४५ वाजता १ नंबर प्लॅटफॉर्मवर, नंतर ७:१५ वाजता गाझीपूर-बांद्रा एक्स्प्रेसला विरार स्थानक ते डहाणूपर्यंत थांबा देण्यात आल्याने गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांची व्यवस्था झाली.
 ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस, जयपूर एक्स्प्रेस संध्याकाळी सहा वाजून ३० मिनिटांनी पालघर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवरून गुजरात दिशेने रवाना झाली.

Web Title: Virar-Dahanu Road, Dahanu Road-Borivali, Valsad, Sanjan-Virar trains had to be cancelled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.