धक्कादायक! विरारमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला भर रस्त्यात मारहाण, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 04:10 PM2021-05-23T16:10:46+5:302021-05-23T16:11:20+5:30
विरार पूर्व भागातील बालाजी हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआरची चाचणी करताना महिला रुग्णाच्या नाकात नळी तुटल्याने नाकातून रक्त येत असल्याचा कुटुंबियांनी आरोप करत डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण
पारोळ : विरार पूर्व भागातील बालाजी हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआरची चाचणी करताना महिला रुग्णाच्या नाकात नळी तुटल्याने नाकातून रक्त येत असल्याचा कुटुंबियांनी आरोप करत डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात डॉ. श्रीराम अय्यर यांनी गुन्हा नोंद केला आहे.
बालाजी हॉस्पिटलमध्ये शनिवारी दुपारी एका महिला रुग्णास उपचारासाठी आणण्यात आले होते. पण उपचारादरम्यान कोरोना चाचणी करत असताना नाकात नळी तुटली असल्याचा आरोप डॉक्टरांवर करत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. या दरम्यान डॉक्टर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना मार्गात त्यांना रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींनी मारहाण केली. मारहाणीचे चित्रण मोबाईलमध्ये होत सोशल मीडियावर पसरल्याने मोठी खळबळ माजली. या प्रकरणी डॉक्टर अय्यर यांनी विरार पोलीस ठाण्यात रुग्णाच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे विरार पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.