Virar Hospital Fire : विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत - दादाजी भुसे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 12:15 PM2021-04-23T12:15:03+5:302021-04-23T12:34:26+5:30
Virar Hospital Fire: या अकस्मात घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देखील प्रशासनाला दिले आहेत असे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी विरार येथे सांगितले.
- आशिष राणे
वसई तालुक्यातील विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर गंभीर जखमी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना एक लाखाची तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर करताना या अकस्मात घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देखील प्रशासनाला दिले आहेत असे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी विरार येथे सांगितले.
दरम्यान, विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात गुरुवारी रात्री (आयसीयू) कक्षाला रात्री 3: 30 च्या सुमारास आग लागल्याची माहिती कळताच नाशिकहुन विरार साठी रवाना झाले आणि थेट पालकमंत्री भुसे यांनी 10 वाजता तातडीने घटनास्थळाला भेट देऊन घटनेची स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली. त्यावेळी तिथे हंबरडा फोडलेल्या मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन ही त्यांनी केले.
एकूणच ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत तसेच या घटनेमध्ये दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. असे ही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी माध्यमाना सांगितले.
(Virar Hospital Fire : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर)