Virar Hospital Fire Live Updates : विरारमधील कोविड सेंटरला आग, 13 रुग्णांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 08:10 AM2021-04-23T08:10:59+5:302021-04-23T15:13:37+5:30

Virar Hospital Fire Live Updates : या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

Virar Hospital Fire Live Updates: 13 people have died in a fire that broke out at Vijay Vallabh COVID care hospital in Virar, early morning today | Virar Hospital Fire Live Updates : विरारमधील कोविड सेंटरला आग, 13 रुग्णांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Virar Hospital Fire Live Updates : विरारमधील कोविड सेंटरला आग, 13 रुग्णांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देविरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही आग लागली. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

विरार : नाशिकमधील एका रुग्णालयात ऑक्सिजन  टाकीचा पाइप फुटून झालेल्या गळतीमुळे २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. ही घटना ताजी असताना आता विरारमधील एका रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली.  या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही आग लागली. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगीनंतर रुग्णालयातील अन्य रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. (Virar Hospital Fire Live Updates: 13 people have died in a fire that broke out at Vijay Vallabh COVID care hospital in Virar, early morning today)

- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात दुपारी 3. 30 वाजता विजय वल्लभ रुग्णालयाला देणार भेट.

अतिशय दुर्दैवी आणि मनाला यातना व क्लेश देणारी - प्रसाद लाड 
आधी भंडारा येथील लहान मुलांचे रुग्णालय तर नाशिक येथील ऑक्सिजन गळती आदी अशा मागील घटनांपासून कोणताही बोध घेण्याची ठाकरे सरकारची तयारी नाही. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागून 13 रुग्ण मृत्यु झाले हे अतिशय दुर्दैवी आणि मनाला यातना व क्लेश देणारे आहे, असे सांगत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रसाद लाड यांनी आगीच्या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. 

मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून चौकशीअंती माहितीचे प्रसिद्धीपत्रक जारी! 

महापालिकेच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत - एकनाथ शिंदे 
विरार रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने घोषित केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त वसई-विरार महापालिकेच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. तसेच, अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेचे व्हिजिलन्स पथक स्थापन करून त्यात औद्योगिक सुरक्षेशी संबंधित तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत - दादाजी भुसे


- विजय वल्लभ रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले होते, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांनी दिली आहे.

"विरार रुग्णालयाची दुर्घटना नॅशनल न्यूज नाही"; आरोग्य मंत्र्यांचं विधान

राज्य सरकार आता तरी जागे व्हा - प्रवीण दरेकर
राज्य सरकार आता तरी जागे व्हा! नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाचं विरारमध्ये व्यवस्थेतील निष्काळजीपणा दिसून आला. याला संपूर्णपण जबाबदार आहे, असा आरोप विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

'सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण...' - राज ठाकरे
विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडुप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

अमित शहा यांनीही या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला  
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही या आगीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, इतरही रुग्णांची उत्तम व्यवस्था व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात सांगितले आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

ही घटना अतिशय दुर्दैवी, क्लेशदायक - उपमुख्यमंत्री अजित पवार
"विरारच्या विजय वल्लभ कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत होरपळून रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले; ही घटना अतिशय दुर्दैवी, क्लेशदायक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!  मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल मी सहसंवेदना व्यक्त करतो. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून त्यात रुग्ण मृत्युमुखी पडणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील,याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.रुग्णालयांची सुरक्षितता,फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशात अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रूटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्यानं घेतली जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा मला विश्वास आहे."

- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची तर जखमींच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत जाहीर

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या आगीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.



 

मुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयातील आगीच्या चौकशीचे निर्देश
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश  दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.


दुर्घटनेनंतर एकनाथ शिंदेंकडून रुग्णालयाची पाहणी
- ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट दिली असून त्यांच्यासोबत आयुक्त गंगाथरन, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली.

- रुग्णालयात घडलेल्या संपूर्ण आगीच्या घटनेची सखोल चौकशी पोलीस महासंचालक मार्फत होणार, असे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
 

- आगीच्या दुर्घटनेप्रकरणी रुग्णांच्या नातेवाईकांचे आरोप गंभीर आहेत, त्यांचे जबाब नोंदवून घेणार, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- या रुग्णालयात घडलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहेत.

- आयसीयुमधील चार रुग्णांपैकी  दोन गंभीर असल्याचे समजते.

- आगीत होरपळून मृत्यू झालेल्या रुग्णांची नावे...

 

- जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ, आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांच्यासह संपूर्ण पोलीस व पालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

- रुग्णालया बाहेर महसूल यंत्रणा व पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविले
रुग्णालयातील अतिदक्षता विभागामधील 17 पैकी 13 जण दगावले, तर अन्य 4  व  इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत असल्याचे विजय वल्लभ रुग्णालय प्रशासनाचे डॉक्टर दिलीप शाह यांनी सांगितले.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

विरारमधील  वल्लभ कोविड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

Web Title: Virar Hospital Fire Live Updates: 13 people have died in a fire that broke out at Vijay Vallabh COVID care hospital in Virar, early morning today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.