Virar Hospital Fire : मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून चौकशीअंती माहितीचे प्रसिद्धीपत्रक जारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 01:50 PM2021-04-23T13:50:34+5:302021-04-23T13:51:12+5:30
Virar Hospital Fire: रुग्णालयातील आयसीयू युनिटमध्ये एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते, यापैकी 13 रुग्णांना व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन इ. उपचार यंत्रणा जोडली असल्याने ते हालचाल करू शकले नाही आणि त्यामुळे या सर्वांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
- आशिष राणे
वसई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास मध्यरात्री ३ च्या सुमारास आग लागून १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीच्या घटनेबाबत वसई-विरार मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून शुक्रवारी दुपारी 12 वाजता संपूर्ण घटना, रुग्णालयातील उपचार घेत असलेले रुग्ण तसेच मयत झालेले रुग्ण यांच्याबाबतच्या प्रत्यक्ष चौकशीनंतर आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक वजा स्पष्टीकरण जारी केले आहे.
या संदर्भात माहिती स्पष्ट करताना स्पष्ट केलं की, विजयवल्लभ हॉस्पिटल, तिरुपती फेज 1 बोळींज, विरार (प.) या तळ + 4 मजली रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तर या रुग्णालयात सुमारे 85 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. या रुग्णालयामध्ये पहिला मजला जनरल वॉर्ड, दुसरा मजला आयसीयू वॉर्ड, आणि तिसरा व चौथा मजला म्हणून स्पेशल वॉर्डचे नियोजन केलेले आहे.
दरम्यान, शुक्रवार दि.23 एप्रिल, 2021 रोजी पहाटे 03.13 वाजता रूग्णालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या (अतिदक्षता विभाग ) आयसीयू युनिटमध्ये एसी स्पार्क होऊन ब्लास्ट झाल्यामुळे सदर आयसीयू युनिटमधील यंत्रणा ठप्प होऊन तेथे आग लागल्याची व सर्वत्र धूर व अंधार पसरला असल्याची माहिती महानगरपालिका अग्निशमन विभागाला 3 वाजून 18 मिनिटांनी मिळताच पहाटे 03 .18 वाजता महानगरपालिका अग्निशमन विभाग यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी जाऊन पहाटे 03.45 वाजेपर्यंत तेथील आगीवर नियंत्रण मिळवले.
(Virar Hospital Fire : 'सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण...' - राज ठाकरे)
विशेष म्हणजे, या रुग्णालयातील आयसीयू युनिटमध्ये एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते, यापैकी 13 रुग्णांना व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन इ. उपचार यंत्रणा जोडली असल्याने ते हालचाल करू शकले नाही आणि त्यामुळे या सर्वांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर प्रामुख्याने इतर 04 रुग्णांना महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेमार्फत तात्काळ दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे.
(Virar Hospital Fire : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर)
या संपूर्ण घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णांमध्ये 5 महिला व 8 पुरुष यांचा समावेश असून त्यांची नावे खालीलप्रमाणे -
१) उमा सुरेश कनगुटकर (63 वर्षे – महिला)
२) निलेश भोईर (35 वर्षे – पुरुष)
३) पुखराज वल्लभदास वैष्णव (68 वर्षे- पुरुष)
४) रजनी आर. कुडू (60 वर्षे –महिला)
५) नरेंद्र शंकर शिंदे (58 वर्षे – पुरुष)
६) जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (63 वर्षे पुरुष)
७) कुमार किशोर दोशी ( 45 वर्षे – पुरुष)
८) रमेश टी. उपायान (55 वर्षे – पुरुष)
९) प्रवीण शिवलाल गौडा (65 वर्षे – पुरुष)
१०) अमेय राजेश राऊत (23 वर्षे – पुरुष)
११) शमा अरुण म्हात्रे (48 वर्षे – महिला)
१२) सुवर्णा एस.पितळे (64 वर्षे – महिला)
१३) सुप्रिया देशमुख (43 वर्षे – महिला)