विरार, नालासोपारा पोलिसांच्या जागेवर बेकायदा इमारती, कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 02:20 AM2017-12-23T02:20:42+5:302017-12-23T02:23:15+5:30
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वसई विरार परिसरातील आदिवासीनंतर आता पोलिसांचे भूखंड भूमाफियांनी लाटल्याचा प्रकार उजेडात आला आहे. विरार आणि नालासोपारा येथील भूखंड लाटून त्याठिकाणी बेकायदा इमारती बांधून बोगस कागदपत्रांच्या द्वारे सदनिकांची विक्री केल्याचे उजेडात आले असून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
शशी करपे।
वसई : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वसई विरार परिसरातील आदिवासीनंतर आता पोलिसांचे भूखंड भूमाफियांनी लाटल्याचा प्रकार उजेडात आला आहे. विरार आणि नालासोपारा येथील भूखंड लाटून त्याठिकाणी बेकायदा इमारती बांधून बोगस कागदपत्रांच्या द्वारे सदनिकांची विक्री केल्याचे उजेडात आले असून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
विरार पूर्वेला पोलिसांसाठी भूखंड राखीव असून त्याठिकाणी पोलीस वसाहत आहे. याठिकाणी वसई वसाहत आणि उपविभागीय पोलीस कार्यालय बांधण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. मात्र, या भूखंडातील जागा भूमाफियांनी बळकावून त्याठिकाणी अनधिकृत इमारती बांधून बोगस कागदपत्रांच्या द्वारे सदनिकांची विक्री आहे.
या जागेची मोजणी करण्यात आली असता भूमी अभिलेख कार्यालयाने साधी मोजणी करून फक्त हद्द कायम दाखवलेली आहे.
दुसरीकडे, नालासोपारा येथील समेळ सर्व्हे नंबर ४९, हिस्सा नंबर ८/४ या पोलिसांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अतिक्रमण भूमाफियांनी बेकायदा इमारती बांधल्या आहेत. याही ठिकाणी बिल्डरांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिकांची विक्री करून ग्राहक आणि वित्तिय संस्थांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी आनंद ठाकूर यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापालिकेने घाईघाईत संबंधित बिल्डरांविरोधात एमआरटीपी अॅक्टखाली गुन्हे नोंदवले आहेत. सदर इमारतींना महापालिकेने बांधकाम परवानगी अथवा भोगवटा प्रमाणपत्र दिलेले नाही. मात्र, विकासकाने बनावट कागदपत्रांद्वारे दुय्यम निबंधकांकडे दस्त नोंदणी केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे महापालिकेने राज्य सरकारला कळवले आहे.