विरार लोकलचे झाले १५२ व्या वर्षात पदार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:28 AM2019-04-13T00:28:41+5:302019-04-13T00:28:46+5:30
दीड शतकी प्रवासाचे सिंहावलोकन : परेला मात्र विस्मरण, महिला प्रवाशांकडून लोकलमध्ये सेल्फी सेलिब्रेशन
वसई : पश्चिम रेल्वेमार्गावर धावणारी विरार लोकल शनिवारी १५२ वर्र्षांची झाली. गेली दीड शतक प्रवाशांच्या सेवेसाठी अविरतपणे धावणारी ही लोकल आजही तितक्याच जोशात धावत आहे.
पश्चिम रेल्वेवरची विरार लोकल पकडणे म्हणजे तारेवरची कसरत असून प्रचंड गर्दीत सिटवर बसायला सोडा डब्यात शिरायलाही जागा नसते. तरीही प्रवाशांची जिवनवाहिनी असलेली ही लोकल प्रवाशांच्या सुखदु:खाशी एकरूप झालेली आहे. तब्बल १५२ वर्षाच्या या लोकलचा डौल व रूबाब अजुनही कायम आहे. १२ एप्रिल, १८६७ रोजी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची आणि सायंकाळी ५.३० वाजता तिच परतीचा प्रवास करायची.
महिलांसाठी ट्रेनमध्ये वेगळा दुसऱ्या श्रेणीचा डबा होता. या व्यतिरिक्त एक स्मोकिंग झोनही होता. त्याकाळी या ट्रेनमध्ये तीन श्रेणी होत्या. लोक सामान्यत: दुसºया श्रेणीने प्रवास करायचे. प्रति मैलाचा दर होता ७ पैसे! तिसºया श्रेणीसाठी दर होता ३ पैसे. त्यावेळी चर्चगेट ते विरार हा प्रवास आज या प्रवासाला लागणाºया वेळापेक्षा कमी वेळात पूर्ण होत असे. कारण मध्ये स्थानके कमी होती. स्थानके अशी होती - नीअल (नालासोपारा), बसीन (वसई), पाणजू (वसईच्या दोन खाड्यांमधले स्थानक), बेरेवाला (बोरीवली), पहाडी (गोरेगाव), अंदारु (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (बांद्रा), माहिम, दादुरे (दादर), ग्रांट रोड. मात्र आजच्या दिवसापेक्षा रेल्वेच्या इतिहासात १६ एप्रिल १८५३ ला अधिक महत्त्व आहे. कारण या दिवशी ठाणे ते बोरीबंदर ट्रेन - देशातली पहिली ट्रेन - धावली. पण ती लोकल नव्हती. लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पिहल्यांदा १ फेब्रुवारी १८६५ रोजी निघालेल्या वेळापत्रकात वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता. काळानुरु प या लोकलमध्ये खूप बदल होत गेले. ६ डब्यांपासून १५ डब्यांपर्यंत लांबलचक झाली ही गाडी. परेवरच जगातली पहिली लेडीज स्पेशल ट्रेन धावली अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ रविंद्र भाकर यांनी दिली होती. पश्चिम रेल्वेचे माजी मुख्य आॅपरेशन मॅनेजर ए. के. श्रीवास्तव यांनी या रेल्वेमार्गावर रोज लाखों प्रवासी प्रवास करतात, पण त्यापैकी अनेकांना आजचा दिवस माहित नाही.
१५२ वर्षाच्या लोकल प्रवासातील अनेक कडू- गोड आठवणींची शिदोरी सोबत घेत लाखो प्रवासी आजही प्रवास करीत आहेत. मात्र आजच्या दिवसाचे महत्व रेल्वेला नसले तरी प्रवाशांना असल्याचे दिसून येत होते. महिला विशेष लोकलमध्ये प्रवासी महिलांनी सेल्फी सेलिब्रेशन करत सुरक्षीत प्रवासासाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
विरार लोकलला दोन वर्षांपूर्वी १५० वर्षे पुर्ण झाली होती तेव्हा, सोहळा साजरा करण्यात आला होता.दरवर्षी असे सेलिब्रेशन किंवा उद्घोषणा करणे रेल्वे प्रवाशांनाही आवडणार नाही.
-गजानन महातपूरकर, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
विरार लोकलला तब्बल १५२ वर्षे पुर्ण झाली आहेत. हा प्रवास आजही अव्याहतपणे सुरू आहे. मात्र, रेल्वेकडून साधी उद्घोषणाही केली जात नाही.
- अॅड.मुदूला खेडेकर,
महिला रेल्वे प्रवासी