विरार म्हाडा मैदानात क्रीडासंकुल साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:21 PM2019-03-01T23:21:38+5:302019-03-01T23:21:46+5:30
३० कोटींची तरतूद : १८ महिन्यांत काम पूर्ण
वसई : पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना चांगल्या क्रीडा सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विरार येथील म्हाडा मैदान येथे अद्यावत क्रीडा संकुल बनविण्यात येत आहे. या संकुलासह नविन क्रीडांगणासाठी स्टेडियम बांधकाम व इतर कामांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 30 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील ४२ महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातून विभाजन करण्यात येऊन नवीन पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला. या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल नसल्यामुळे अद्यावत क्रीडा संकुल बनविण्यात यावे, जेणेकरून येथील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतील अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत या खेळाडूंसाठी विरार येथील म्हाडाच्या जागेत हे क्रीडा संकुल उभारण्यात येण्यात यावे, असा प्रस्ताव आमदारांच्यावतीने सादर करण्यात आला होता. म्हाडाची जमीन पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आल्यानंतर दि. २६ नोव्हेंबर २०१७ रोजी भूमिपूजन सोहळा झाला होता. या संकुलात ओलिंपिक साईज तरण तलाव, ४00 मिटरचा सिंथेटीक रिनंग ट्रॅक,लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, हातोडाफेक, फुटबॉल इत्यादि खेळांच्या सुविधांसह बास्केटबॉल, बैडमिंटन, टेबलटेनिस या खेळांबरोबरच मार्शल आर्ट ,योगाभ्यास यासाठी इनडोअर सुविधा असतील.
विरार येथील म्हाडा वसाहतीनजीक हे क्रीडा संकुल बनविण्यात येत असून , सात एकरमध्ये मैदानी व बंदिस्त खेळासाठी अद्यावत सुविधा असणार आहे. क्रीडा संकुलाचे काम प्रगतिपथावर आहे.
- सुदेश चौधरी,
स्थायी समिती सभापती
क्रीडा संकुलाच्या कामासाठी कार्यादेश काढून आठ महिने झाले आहेत.काम सुरू असून ४२ महिन्यात काम पूर्ण होईल.
- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता वसई विरार महानगरपालिका