विरारमधून संपूर्ण कुटुंब गायब, सुनेची पोलिसांत तक्रार, सहा जण १५ आॅक्टोबरपासून बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:17 AM2017-11-03T00:17:12+5:302017-11-03T00:17:17+5:30
विरारमधून एका कुटुंबातील सहा जण १५ आॅक्टोबरपासून बेपत्ता झाले आहेत. अमरावती येथे राहणा-या त्यांच्या सुनेच्या तक्रारीनंतर अर्नाळा सागरी पोलीस कुटुंबांचा शोध घेत असून, अद्याप त्यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही.
- शशी करपे
वसई : विरारमधून एका कुटुंबातील सहा जण १५ आॅक्टोबरपासून बेपत्ता झाले आहेत. अमरावती येथे राहणाºया त्यांच्या सुनेच्या तक्रारीनंतर अर्नाळा सागरी पोलीस कुटुंबांचा शोध घेत असून, अद्याप त्यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही.
विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीमध्ये शर्मा कुटुंब राहते. सुरेंद्र शर्मा (५०), पत्नी अनिता शर्मा, वरुण शर्मा (२७), अश्विनी शर्मा (३४), प्रियंका शर्मा (१६), मालती शर्मा (५२) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. वरुणची पत्नी संगीता शर्मा बाळंतपणासाठी माहेरी अमरावती येथे गेल्या आहेत. १५ जूनला संगीताला मुलगी झाली. त्यानंतर वरुण १५ दिवस अमरावतीला राहिला होता. आॅगस्टमध्ये वरुणचे वडील सतीशचंद्र शर्मा यांचे निधन झाले होते. त्यानंतर वरुण आॅक्टोबर महिन्यात अमरावतीला जाऊन संगीता आणि मुलीला भेटूनही आला होता. १४ आॅक्टोबरला संगीता आणि वरुण यांच्यात मोबाइलवर शेवटचे बोलणे झाले होते. वरुणचा संपर्क होत नसल्याने संगीता शर्मा यांनी वरुणचे काका सुरेंद्र शर्मा यांना फोन केला असता थोड्या वेळाने फोन करतो असे उत्तर त्यांनी दिले होते. तेव्हापासून सर्वांचेच मोबाइल बंद झाले होते.
धास्तावलेल्या संगीता शर्मा यांनी गुगलवरून अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी शर्मा यांच्या घरी धाव घेतली असता त्यांचे घर बंद आढळून आले. पोलिसांनी शेजाºयांकडे चौकशी केली तेव्हा काही दिवस नाशिकला जात आहोत, असे शर्मा कुटुंबाने त्यांना सांगितल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी इमारतीच्या आवारातील सीसीटीव्ही फूटेज तपासले आहे. १५ आॅक्टोबरला पहाटे साडेतीनच्या सुमारास सहा जण एका भाड्याच्या कारमध्ये सामान टाकून बसून निघून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोबाइल लोकेशन मिळणेही कठीण
पोलिसांनी शर्मा कुुटुंबीयांचे मोबाइल लोकेशन तपासले तेव्हा पहिल्यांदा नाशिक दाखवले गेले. त्यानंतर सुरत लोकेशन मिळाले. पण, नंतर सर्वांचेच मोबाइल बंद असल्याने लोकेशन मिळणेही कठीण होऊन बसले आहे. अर्नाळा पोलिसांनी शर्मा कुुटुंबीयांच्या शोधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. कर्ज, आर्थिक व्यवहार किंवा कौटुंबिक कलह आहे किंवा काय यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.