विरार-मुंबई एसी बस सुरु होणार

By admin | Published: February 23, 2017 05:24 AM2017-02-23T05:24:27+5:302017-02-23T05:24:27+5:30

वसई विरार महापालिकेच्या महासभेत परिवहन सेवेला अंधेरी आणि भांडूप या दोन मार्गावर

The Virar-Mumbai AC bus will be started | विरार-मुंबई एसी बस सुरु होणार

विरार-मुंबई एसी बस सुरु होणार

Next

वसई : वसई विरार महापालिकेच्या महासभेत परिवहन सेवेला अंधेरी आणि भांडूप या दोन मार्गावर प्रायोगिक तत्वावर वातानुकूलित बस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. भाजपाने याला विरोध केला तर शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने बहुमताने बस सेवा सुरु करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
हा प्रस्ताव चर्चेसाठी महासभेत आला होता. त्याला शिवसेना आणि भाजपाने आक्षेप घेतला. शहरवासियांना पुरेशी बससेवा द्या. तसेच ग्रामीण भागात एसटी १ एप्रिलपासून बंद होणार असल्याने आधी त्या मार्गावर बससेवा सुरु करून वसईकरांची संकटातून मुक्तता करा. त्यानंतर बाहेरच्या मार्गावर बसेस सुरु करा, अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर आणि भाजपाचे गटनेते किरण भोईर यांनी करून एसी बससेवेला विरोध केला. त्यामुळे प्रस्ताव मतदानाला टाकण्यात आला. भाजपाने प्रस्तावाला विरोध केला. तर शिवसेनेचे नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केला. महापालिकेची परिवहन सेवा भागिरथी ट्रान्स कार्पो ही खाजगी कंपनी चालवीत आहे. परिवहन समितीच्या बैठकीत भांडुप आणि अंधेरी सिप्झ या दोन मार्गावर वातानुकूलित बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बसमध्ये वातानुकूलित पँट्री, केमिकल टॉयलेट, प्राथमिक औषधोपचार पेटी अशा सुविधा देण्यात येणार आहेत. सध्या प्रायोगिक तत्तावर दोन मार्गावर वातानुकूलित बसेस सुरु केल्या जाणार आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून इतर मार्गांवर याच पद्धतीने वातानुकूलित सेवा सुरु करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

असा असेल मार्ग
अंधेरी सिप्झला जाणारी बस विरारहून सुटून नालासोपारा, वसंत नगरी, सातीवली, सिप्झपर्यंत जाऊन पुन्हा त्याच मार्गाने परत येणार आहे. तर भांडूपला जाणारी बस विरारहून सुटून नालासोपारा, वसई, सातीवली, दहिसर चेकनाका, जोगेश्वरी लिंंक रोड, पवई, ठाणे पूर्व, कोपरीहून पुन्हा त्याच मार्गाने परत येणार आहे.

Web Title: The Virar-Mumbai AC bus will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.