विरारच्या दोन बहिणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी विकले, १२ जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 11:50 PM2018-10-21T23:50:09+5:302018-10-21T23:51:29+5:30
विरारमधील दोन सख्ख्या बहिणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी दिड लाख रूपयांना विकल्याची घटना समोर आली आहे.
नालासोपारा : विरारमधील दोन सख्ख्या बहिणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी दिड लाख रूपयांना विकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सासरच्यांसह १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोघींच्या माहेरुन १० लाख रूपये वसूल करूनही सासरच्या लोकांची हाव भागली नाही. शेवटी त्यांनी सख्ख्या जावा झालेल्या या दोन्ही बहिणींना सासरच्या मंडळींनी अनन्वीत अत्याचार करून विकून टाकले होते. सहप्रवाशाने मदत केल्याने हा कट उघडकीस आला.
विरार येथील संजय व वरूण रावळ या दोन भावांचा दोन सख्ख्या बहिणींसोबत २०१५ साली विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर रावळ कुटुंबीयांनी हुंड्यासाठी या दोघींवर अनन्वीत अत्याचार सुरू केले. माहेरच्यांकडून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी त्यांचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात येत होता. तीन वर्षे हा अत्याचार या दोघी मुकाट सहन करीत होत्या. या दरम्यान दहा लाखांहून अधिक रक्कम सासरच्यांनी उकळली होती. मात्र त्यांची पैशाची हाव कमी होत नव्हती. आणखी चार लाखांची मागणी ते करू लागल्यावर या दोघींनी आता पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितल्यामुळे सासरची मंडळी चिडली होती. हे चार लाख मिळविण्यासाठी सासरच्यांनी या दोघींना राजस्थानमधील विरवडा येथे नेऊन जाळून मारण्याची धमकीही दिली. तरी पैसे मिळत नाही. हे पाहताच त्यांनी या दोघींची एका व्यक्तीला दिड लाखात विक्र ी केली होती.
३० आॅगस्ट रोजी सासरची मंडळी या दोन्ही सुनांना घेऊन आपल्या राजस्थानातील मूळ गावी गेले होते. ९ सप्टेंबरपर्यंत जनापूर येथे राहिल्यावर एका अनोळखी व्यक्तीसोबत त्यांना मुंबईला पाठविण्यात आले. मात्र वसई रोड स्थानक आल्यावर या दोघींना या व्यक्तीने उतरूवून देतांना, तुम्हाला सासरच्यांनी दिड लाखात मला विकल्याचे सांगितल्यामुळे त्यांना धक्का बसला.
सुदैवाने त्याच डब्यातून प्रवास करणा-या एका गुजराती कुटुंबानी त्यांची सुटका करत त्यांना वसईरोडला उतरण्यास मदत केली.
>या महिलांच्या तक्रारींवरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ४९८ (अ) कलम लावण्यात आला असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिक तपासानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. सध्या कोणालाही अटक केली नाही. - विजयकांत सागर, अप्पर पोलिस अधीक्षक, वसई