वसई-नायगावमध्ये युरोपातील पाहुण्या फ्लेमिंगोंचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:28 AM2018-08-19T03:28:23+5:302018-08-19T03:28:39+5:30
सिमेंटच्या जंगलामुळे साजेसे वातावरण नाही; आवडते खाद्य शेवाळ, कीटक, अळ्या, पाणकिडे आणि छोटे मासे झाले कमी
विरार : दरवर्षी प्रमाणे यंदाही वसई नायगाव परिसरात फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. मात्र, या वर्षी त्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. वसई मधील सनसिटी, गोगटे सोल्ट, उमेळमान, राजिवली आणि नायगाव येथे फ्लेमिंगो या पक्षांचे वास्तव्य तीन महिने असते. तर पक्षी प्रेमींनी त्यांचे हे मोहक रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी केलली पहावयास मिळत आहे. वसई सनसिटी भागत तर पक्षीप्रेमींची छायाचित्रे काढण्यासाठी संध्याकाळच्या वेळी गर्दी होत आहे.
दरवर्षी पावसाच्या साचलेल्या पाण्यावर हे परदेशी पक्षी येत असतात. चमचेकरकोचे, उघड चोच करकोचे, राखाडी बगळे, वारकरी बदक आणि अजूनही खूप वेगवेगळे पक्षी येथे हजेरी लावत असतात. त्यामुळे पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांची मोठी गर्दी असते.
फ्लेमिंगो या पक्षाला रोहित किंवा हंस हे पारंपारीक नाव आहे. हा पाहुणा दरवर्षी युरोपहून वसई नायगाव मध्ये पाहुणचारासाठी येत असतो. याचे मूळ वास्तव्य हे युरोप मधील सायबेरियात आहे. पावसाळ्यात हे पक्षी इतर ठिकाणी जात असतात. यंदा त्यांनी वसईत मुक्काम ठोकला असल्याचे दिसून येत आहे.
या पक्षांचे आवडते खाद्य शेवाळ, कीटक, अळ्या, पाणकिडे आणि छोटे मासे आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने या पक्षांचे आगमन देखील लवकर झाल्याचे दिसून येत आहे.
फेब्रुवारी ते एप्रिल च्या दरम्यान पाण्याच्या अनुकूल परिस्थितीनुसार ते कच्छ मध्ये असतात, नंतर सप्टेंबर ते आॅगस्ट दरम्यान वसईत आगमन करतात. वसईच्या मिठागरांत फ्लेमिंगो ची राखाडी कलर ची पिल्ले दिसून येत आहेत. हा त्यांचा प्रजननाचा काळ असल्याने त्यांच्या हालचालीचे टप्पे टिपण्यासाठी पक्षी अभ्यासकांनी येथे बस्तान बांधले आहे.
फ्लेमिंगोंच्या संख्येत घट
फ्लेमिंगो हे पक्षी पाणथळ जागेत जास्त दिसतात. मात्र, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी पाणथळ जागेत माती टाकून तिथे भराव करून, बिल्डर इमारतीच जंगल तयार करत आहेत. त्यामुळे फ्लेमिंगो पक्षांची संख्या देखील कमी होत चालली आहे. त्यांना हवे असलेले अनुकूल वातावरण व त्यांचे आवडते खाद्य पदार्थ त्यांना आधी वसई - विरार भागत मुबलक प्रमाणत मिळत होते. मात्र, आता ते कमी झाले आहेत. माणसांनची चाहूल लागली की, ते अजून दूर जातात. या सर्व परिस्थितीमुळे त्यांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. असे पक्षी प्रेमी सचिन मेन यांनी सांगितले आहे.