वाघोबा धबधब्यावर पर्यटकांना सक्त मनाई
By admin | Published: August 8, 2016 01:59 AM2016-08-08T01:59:51+5:302016-08-08T01:59:51+5:30
पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटा जवळील धबधब्या वरील मोठमोठे दगड आणि दरड कोसळण्याच्या मार्गावर असल्याने वनविभाग आणि पोलिसांनी पर्यटकांना धबधब्यावर यायला
पालघर : पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटा जवळील धबधब्या वरील मोठमोठे दगड आणि दरड कोसळण्याच्या मार्गावर असल्याने वनविभाग आणि पोलिसांनी पर्यटकांना धबधब्यावर यायला बंदी घातली आहे.तर बाजूच्याच रस्त्याच्या कडेजवळील डोंगरावरही १५ ते २० टनाची महाकाय शिळा आणि दरड ही धोकादायक अवस्थेत अडकलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत असल्याने जिल्हाधिकाऱ्याने त्याबाबतही गांभीर्यपूर्वक उपाययोजना आखण्याच्या सूचना वनविभागाला दिले आहेत.
मागील ७ दिवसांपासून पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून निसर्गाने धारण केलेल्या रौद्रावताराने जिल्ह्यात आता पर्यंत २२ बळी घेतले आहेत. मागील २० जून पासून जवळपास नियमितपणे कोसळणाऱ्या पावसाने सर्वांचा जीव नकोसा करून टाकला आहे. सावित्रीच्या घटनेनंतर तर पावसाने सर्वांच्या मनात दहशत माजवून ठेवली आहे.आपापल्या घरातून नोकरी, व्यवसाय, शिक्षण ई.साठी बाहेर पडणारा माणूस घरात संध्याकाळी सुखरूप येईलच याची शाश्वती राहिली नसल्याने अनेक कुटुंबीय काळजीत जगत आहेत.
पालघर जिल्ह्यात आता पर्यंत विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक नदी, नाले, धबधबे, ओसंडून वहात आहेत. पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटातील धबधबा हा पालघर आणि परिसरातील पर्यटकांचा आवडीचे ठिकाण बनला असल्याने शनिवार,रविवार आणि अन्य सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु सतत कोसळणाऱ्या तुफानी पावसामुळे या धबधब्याच्या दोन्ही बाजूचे दगड आणि दरडी कोसळल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिल्या नंतर वन विभागासह पालघर पोलिसांनी या ठिकाणी आपली गस्त वाढविली असून पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. या संदर्भात पालघर चे वनसंरक्षक कुप्ते यांच्याशी संपर्क साधला असता वनकर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता धोकादायक परिस्थिती वाटत नाही, तरीही त्या ठिकाणी गस्त ठेवली आहे, असे सांगितले. (प्रतिनिधी)