बनावट पासपोर्ट व व्हीसा प्रकरणात १५ राज्यांतील वाँटेडला एटीएसची अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:56 AM2019-05-26T00:56:21+5:302019-05-26T00:56:23+5:30
आखाती देशात नोकरी देतो, असे सांगून बनावट व्हिसा, पासपोर्ट बनवून सुमारे १५ राज्यातील लोकांची फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात पालघर एटीएसला यश आले आहे.
नालासोपारा : आखाती देशात नोकरी देतो, असे सांगून बनावट व्हीसा, पासपोर्ट बनवून सुमारे १५ राज्यातील लोकांची फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात पालघर एटीएसला यश आले आहे. उबेद अली अकबर शेख (४३) असे आरोपीचे नाव असून गेल्या दीड महिन्यांपासून दहशतवाद विरोधी पथक त्याच्या मागावर होते. त्याला शुक्रवारी कामाठीपुरा येथून अटक केली आहे. वसई न्यायालयात शनिवारी नालासोपारा पोलिसांनी त्याला हजर केल्यावर २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
परदेशात नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना तुम्हाला परदेशात पाठवतो, असे आमिष दाखवून उबेद अली अकबर शेख (४३) हा त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन त्यांचे मेडिकल करुन त्यांना पासपोर्ट, व्हिसा बनवून द्यायचा. हा व्हीसा आणि पासपोर्ट तो हुबेहूब बनवून देत असल्याने कोणालाच संशय येत नव्हता. एअरपोर्टवर गेल्यानंतर आपल्याकडे असलेला व्हीसा आणि पासपोर्ट खोटा असल्याचे संबंधितांना समजायचे ते परत उबेद शेखला जाब विचारायला येईपर्यंत उबेद आॅफिसला टाळे मारु न फरार झालेला असायचा. अशा प्रकारे उबेदने मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, लखनौ, हैद्राबाद, अहमदाबाद, इलाहाबाद, केरळ, दार्जिलिंग, बेळगाव, बेंगलोर, इंदोर, भोपाळ, बिहार आदी राज्यातील हजारो लोकांची फसवणूक केली आहे. या सर्व राज्यातील पोलीस त्याच्या मागावर होते.
उबेद शेख हा विरार येथील ग्लोबल सिटी परिसरात असल्याची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर त्यांनी तेथे सापळा लावला. मात्र त्याआधीच उबेद शेख तेथून निघून गेला होता. पण त्याचा एक साथीदार त्यांच्या हाती लागला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उबेदने मीरा रोड येथे आॅफिस थाटले होते. मात्र तेथेही तो नव्हता. पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, चंद्रकांत ढाणे, प्रकाश कदम, तुरकर, लोहार, सचिन पाटील, सुभाष आव्हाड, जगदीश गोवारी, संतोष निकोळे, तुषार माळी, शुभम ठाकूर, वैशाली कोळेकर यांच्या टीमने तपास सुरु ठेवला. होता तो सफल ठरला.
>वारसा चालविला....
गेल्या वर्षी अटक झालेला उस्मान शेख हा उबेद याचा सख्खा काका असून त्याचे वडील अकबर शेख सुद्धा हेच काम करायचे. हे तिघे मिळून हजारो जणांना परदेशात नोकरीला जाण्यासाठी बनावट पासपोर्ट आणि व्हीसा बनवायचे. या त्रिकुटाने आतापर्यंत हजारो लोकांना फसवले आहे. मोठा भाऊ अकबर याचा वारसा लहान भाऊ उस्मान याने सुरू ठेवला.
>मीरा रोड येथील कार्यालयाच्या उद्घाटनाच्या आधीच पोलिसांनी पकडले...
मीरा रोडच्या कणिक या परिसरात परदेशात नोकरीला पाठवण्यासाठी सुसज्ज असे कार्यालय थाटले होते. संपूर्ण स्टाफ आणि फर्निचरचे संपूर्ण काम झालेल्या कार्यालयाचे रमजान महिन्यातील शुक्र वारी उद्घाटन होणार होते पण त्याआधीच उबेदला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
>आतापर्यंत हजारो लोकांना उबेद याने फसवले असून तो मास्टर मार्इंड आहे. अनेक राज्यातून तो फरार होता. जिकडे जाईल तिकडे नावे बदलून तो राहायचा. खबरीमार्फत माहिती मिळाल्यानंतर उबेद याला अटक केली आहे. त्याचे काही साथीदार फरार आहेत.
- मानसिंग पाटील (सहायक पोलिस निरीक्षक, एटीएस,