मतदारयाद्या होणार १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:55 AM2021-02-10T01:55:26+5:302021-02-10T01:55:42+5:30
वसई पालिका निवडणुकीची तयारी सुरू
वसई : मागील वर्षभरापासून लोकप्रतिनिधीविना व प्रशासक म्हणून नियुक्त असलेल्या वसई-विरार शहर महापालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया आता खऱ्या अर्थी सुरू झाली आहे. येत्या दि. १६ फेब्रुवारीला पालिका प्रशासन विभागांतील मतदार याद्या प्रसिद्ध करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
गतवर्षी दि. १३ मार्चला वसईत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केले आणि सर्वच कामकाज ठप्प झाले. महापालिका तसेच लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ दि. २८ जून २०२० रोजी संपुष्टात आला आणि महापालिकेत नवे आयुक्त हेच प्रशासक म्हणून कारभार बघू लागले.
परिणामी, दि. २८ जूनच्या रात्रीपासून आयुक्त गंगाथरन डी. हे आयुक्त व प्रशासक असा दुहेरी कारभार हाकत आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून महापालिका निवडणुकीची लोकप्रतिनिधी आणि नागरिकही अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचता येत नसल्यामुळे व पालिकेत आलेले बहुतेक नवीन अधिकारी माजी नगरसेवकांनाही दाद देत नसल्यामुळे नागरिक आपला लोकप्रतिनिधी निवडून येण्याची वाट पाहत आहेत.
गेल्या ९ महिन्यांपासून पालिकेतील प्रशासकीय कामे, नाले साफसफाई, रस्त्यावरील फेरीवाल्यांचे, पार्किंगचे अतिक्रमण, बेकायदा बांधकामे वाढत चालली आहेत. विविध दाखले, थकीत पाणीपट्टीसाठी, घरपट्टीसाठी मुदतवाढ अशा अनेक समस्यांमध्ये नागरिकांना लोकप्रतिनिधींची गरज भासू लागली आहे. तर राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या निर्देशानुसार त्यांची प्रतीक्षा आता संपत आल्याचे महापालिकेने सुरू केलेल्या निवडणुकीच्या हालचालीवरून दिसून आले आहे.
निवडणूक कामकाजाचे अधिकाऱ्यांना वाटप
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त गंगाथरन यांनी विविध कामांसाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. डॉ. किशोर गवस यांची नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रभागनिहाय उपायुक्त्यांच्याही नेमणुका करण्यात आल्या आहेत.
यात प्रदीप जांभळे-पाटील, नयना ससाणे, पंकज पाटील, शंकर खंदारे, दीपक कुरळेकर, विजयकुमार द्वासे, तानाजी नराळे, चारुशीला पंडित यांची अनुक्रमे ‘ए’ ते ‘आय’ प्रभाग समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने आपापल्या प्रभागातील निवडणूकविषयक सर्व पूर्वतयारी आणि कामकाजाची जबाबदारी संबंधित उपायुक्तांवर सोपविण्यात आली आहे.