भर पावसात मतदारराजाने बजावला हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:30 AM2018-06-26T00:30:10+5:302018-06-26T00:30:12+5:30
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी पालघर जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मतदानाच्या वेळी पदवीधर मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला
पालघर : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी पालघर जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मतदानाच्या वेळी पदवीधर मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. सकाळ पासून मुसळधार पाऊस पडत असतानाही मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजावल्याने सुमारे ६४ टक्के मतदान झाले आहे.
दिवसभर मुसळधार सुरू असलेल्या पावसाचा या निवडणुकीच्या मतदानावर फारसा परिणाम झाला नाही. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदानासाठी ८ हजार ९१२ पुरुष तर ८ हजार ८७ स्त्रिया असे एकूण १६ हजार ९८२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार होते. पालघर येथे ७८.७ टक्के, बोईसर केंद्रावर ७३.६ टक्के तर सफाळे केंद्रावर ८०.५ टक्के मतदान झाले. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते व कार्यकर्ते मतदारांना घराबाहेर काढत होते. पदवीधर निवडणूकीत पहिल्यांदाच इतका उत्साह मतदारांमध्ये दिसून येत होता.
दुपारनंतर मतदानात वाढ
सकाळी मतदानाला थंड प्रतिसाद मिळत असला तरी मात्र दुपार नंतर मतदानात वाढ झाली. संध्याकाळी पालघर सह अनेक मतदान केंद्रावर शेकडोने मतदार मतदानासाठी आल्याने त्यांना उशिरा पर्यंत मतदान करून देण्यात आले.
कासा केंद्रात ८९.१७ टक्के मतदान
कासा : डहाणू तालुक्यातील कासा केंद्रात कोंकण पदवीधर मतदार संघासाठी सोमवारी झालेल्या मतदानात ८९.१७ टक्के इतके मतदान झाले. कासा केंद्रात ५३ स्त्री व १७८ पुरु ष असे एकूण २३१ मतदार होते. त्यापैकी ४३ स्त्री व १६३ पुरु ष असे एकूण २०६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान सकाळपासून पाऊस होता तरी मतदानासाठी दूरवरून मतदार येत होते.