तापमान तपासूनच करावे लागणार मतदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 01:00 AM2021-01-14T01:00:46+5:302021-01-14T01:01:02+5:30
केंद्रांमध्ये विशेष व्यवस्था : मास्कमुळे मतदारांची ओळख पटवण्यात अडचणी
सुनील घरत
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : पालघर जिल्ह्यात सत्पाळा, पाली व सांगावे या तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. यंदाची निवडणूक कोरोना महामारीत होत असल्याने मतदान केंद्रांमध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे तापमान तपासले जाणार असून त्यानंतरच संबंधिताला मतदान करता येणार आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मतदारांना स्वत:ची काळजी घेऊनच मतदान करावे लागणार आहे. मतदान करताना मतदारांमध्ये सोशल डिस्टन्स राखण्यासाठी केंद्रामध्ये विशेष व्यवस्था करावी लागणार आहे.
वसई तालुक्यात होत असलेल्या या निवडणुकीत सत्पाळामध्ये ९०१ मतदार आहेत. त्यामध्ये ४७० पुरुष, तर ४३१ महिला असून ११ जागांसाठी या ठिकाणी मतदान होणार आहे. तसेच पाली ग्रामपंचायतीत चार जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत ६२३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ३१४ पुरुष, तर २०९ महिला मतदार आहेत. तीन उमेदवार बिनविरोध आल्याने चार जागांसाठी निवडणूक होणार आहे.
मतदान केंद्रांवर ओळख कशी पटणार?
तोंडावर मास्क असल्याने मतदारांची मतदान केंद्रावर ओळख कशी पटणार, हाही या ग्रामपंचायत निवडणुकीतील मोठा प्रश्न आहे. मतदान केंद्रावर ओळखपत्र घेऊन जाणे व ओळख पटवून मतदान करणे हे अनिवार्य आहे. यासाठी आता निवडणूक आयोगाने विशेष ओळखपत्राची व्यवस्था केली आहे. मतदार यादीतही मतदाराच्या फाेटोचा समावेश आहे. पण आता ही निवडणूक कोरोनाकाळात हाेत असल्याने मतदारांना मास्क अनिवार्य केले आहे.
वसई ग्रामीणमधील कोरोनास्थिती
स्वॅब १२,४४१, निगेटिव्ह १०,८६७, पॉझिटिव्ह १,३६६, मृत्यू ४९. आताचे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ४.
वसईत कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण कमी असले तरी धोका कायम आहे. यासाठी निवडणूक आयोगाला मतदानाच्या वेळी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
कोरोनाकाळात होत असलेली निवडणूक नियम व अटी पाळून पार पाडावी लागत असल्याने त्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. मात्र वसई तालुक्यात कोरोनाचे सर्व नियम, अटी पाळून सत्पाळा व पाली या ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्व व्यवस्था केली आहे.
- उज्ज्वला भगत, तहसीलदार वसई
मतदानासाठी प्रशासनाने
केलेली तयारी व नियम
कोरोनाकाळात निवडणूक होत असल्याने काही नियम पाळून मतदान करावे लागणार आहे. निवडणुकीदरम्यान मास्क वापरावा. मतदान केंद्रामध्ये येणाऱ्या मतदारांचे थर्मल स्कॅनिंग केले जावे. मतदान केंद्राच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करावी. मतदान केंद्रे मोठ्या खोल्यांमध्ये घ्यावीत. मतदानाच्या ठिकणी मतदारांमध्ये सोशल डिस्टन्स असावे, आदी नियम प्रशासनाने आखून दिले आहेत.