वाडा महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद
By admin | Published: April 24, 2017 11:48 PM2017-04-24T23:48:13+5:302017-04-24T23:48:13+5:30
महावितरणच्या खानिवली कार्यालयातील तंत्रज्ञ प्रकाश पाटील यांनी विजेची चोरी पकडली याचा राग मनात धरून बिलोशी येथील एका इसमाने
वाडा : महावितरणच्या खानिवली कार्यालयातील तंत्रज्ञ प्रकाश पाटील यांनी विजेची चोरी पकडली याचा राग मनात धरून बिलोशी येथील एका इसमाने शनिवारी सायंकाळी त्यांना बेदम मारहाण केल्याला. दोन दिवस झाले तरी आरोपीला पोलिसांनी अटक न केल्याच्या निषेधार्थ आज वाडा उपविभाग कार्यालयातील सर्व कर्मचा-यांनी काम बंद ठेवले.
महावितरणच्या खानिवली येथील कार्यालयात प्रकाश पाटील हे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी महावितरणच्या पथकाने बिलोशी गावात धाड टाकून एकूण ३१ जणांना विजेची चोरी करताना पकडले होते. यात प्रविण उर्फ बाब्या पाटील यांनाही पकडले होते. याचा राग प्रविण यांच्या मनात होता. शनिवारी (दि, २२) सायंकाळी ते बिलोशी गावात काम करण्यासाठी गेले असता प्रविण याने त्यांना दंडुक्याने मारहाण केली त्यात ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शनिवारी घटना घडूनही पोलीस आरोपीला अटक करीत नसल्याच्या निषेधार्थ आज सकाळपासून महावितरणच्या वाडा उपविभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला आज सायंकाळी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
या आंदोलनात वीज कामगार महासंघ, मागासवगीॅय संघटना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, एस. ई. ए. आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)