वाडा नगरपंचायतीवर आघाडीचे वर्चस्व कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:17 AM2021-01-05T00:17:18+5:302021-01-05T00:17:20+5:30
चारही समिती सभापतींची बिनविरोध निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : वाडा नगरपंचायतीच्या चार विषय समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना दोन आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पक्षाला प्रत्येकी एका समितीवर बिनविरोध विजय मिळाला आहे. विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी सोमवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत विरोधी पक्ष भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
वाडा नगरपंचायतीमध्ये एकूण १७ सदस्य संख्या असून यामध्ये शिवसेना ६, भाजप ६, काँग्रेस २, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व आर.पी.आय. यांचा प्रत्येकी एक सदस्य असे संख्याबळ आहे. नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडून आले आहेत. या पदावर शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर विराजमान आहेत. सत्तास्थापनेवेळी झालेल्या करारानुसार समितीच्या वाटपाबाबत वाटाघाटी करण्यात
आल्या होत्या.
सोमवारी झालेल्या निवडणुकीत पाणीपुरवठा समिती संदीप गणोरे, महिला व बालकल्याण समिती शुभांगी धानवा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर, नियोजन समितीच्या सभापतीपदी रामचंद्र जाधव, बांधकाम समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुचिता पाटील यांच्या उमेदवारीवर विरोधी पक्षाने तांत्रिक मुद्दा उपस्थित करून आक्षेप घेतला होता. त्यांच्याविरोधात अनुक्रमे भाजपचे रामचंद्र भोईर व रिमा गंधे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्चना कदम यांनी विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या हरकती अमान्य केल्याने भाजपच्या सदस्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
दरम्यान, नवनिर्वाचित नियोजन समिती सभापती रामचंद्र जाधव, बांधकाम समिती सभापती सुचिता पाटील, पाणीपुरवठा समिती सभापती संदीप गणोरे व महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी धानवा यांचे अभिनंदन होत आहे.
भाजपची माघार
शिवसेना ६, भाजप ६, काँग्रेस २, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी व आर.पी.आय. यांचा प्रत्येकी एक सदस्य असे संख्याबळ आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग वाडा तालुक्यातही झालेला असल्यामुळे येथे भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले आहे. भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे चारही समित्यांचे सभापती बिनविरोध निवडले गेले आहेत.