वाडा नगरपंचायतीचा प्रचार शिगेला, अधिवेशन सोडून पालकमंत्र्यांचा ठिय्या, अन्य पक्षांचे मातब्बर नेतेही बसले तळ ठोकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:24 AM2017-12-12T03:24:42+5:302017-12-12T03:24:51+5:30
नगरपंचायतीची निवडणूक येत्या १३ तारखेला होत असून येथील प्रचार शिगेला पोहोचला आहे. मंगळवार दि, १२) रात्री १० वाजेपर्यंत प्रचार संपणार असल्याने आज सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारावर भर दिला.
वाडा : नगरपंचायतीची निवडणूक येत्या १३ तारखेला होत असून येथील प्रचार शिगेला पोहोचला आहे. मंगळवार दि, १२) रात्री १० वाजेपर्यंत प्रचार संपणार असल्याने आज सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारावर भर दिला. दरम्यान, आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असतांनाही आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा मात्र वाडा येथेच ठाण मांडून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
येत्या बुधवारी (दि, १३) वाडा नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक पक्ष जोरदारपणे प्रचार करीत आहेत. शिवसेनेने बैलगाडी , वासुदेव व शाहीर अशा ग्रामीण व पारंपारिक पद्धतीने प्रचार सुरू ठेवला आहे. तर भाजपने हायटेक पध्दतीने प्रचार यंत्रणा राबवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सायकलवर बॅनरबाजी करून संपूर्ण शहरात प्रचार सुरू ठेवला आहे. काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, मनसे हे पक्ष सुद्धा प्रचार रॅली शिवाय प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आपआपल्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचला असून उद्या रात्री १० वाजता प्रचार संपणार आहे. दरम्यान, मंत्रीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा हे गैरहजेरी लावून वाड्यातच ठाण मांडून बसलेले आहेत. कार्यकत्यांच्या सभा, मतदारांची प्रत्यक्ष भेटींवर त्यांनी भर दिला असून यातच ते मश्गुल आहेत. राज्यात कुपोषण, आश्रमशाळांचा प्रश्न असे अनेक प्रश्न असतांना त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मुलीच्या राजकीय भवितव्यासाठी ते वाड्यातच ठाण मांडून आहेत.
सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी अनेक अर्ज दाखल
तलासरी : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या जाहीर झालेल्या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी कंबर कसली असून तालुक्यातील कवाडा, उपलाट, कुर्झे, गिरगाव, घीमणीया, उधवा करजगाव या ग्रामपंचयतीच्या निवडणूक होणार असून आज शेवटच्या दिवस अखेर एकूण ३२३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.
यामध्ये ७ सरपंच पदासाठी एकूण ३१ उमेदवार तर ९७ सदस्य पदासाठी २९२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. हे अर्ज आॅनलाईन भरण्यात येत असल्याने इंटरनेटचे कनेक्शन, वीज बेपत्ता होणे इत्यादी कारणांनी हे अर्ज भरतांना राजकीय पक्षांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यावर कुणाला काही इलाज करता येत नव्हता.
आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छूकांनी सायबर कॅफे आणि कार्यालयातील संगणक इत्यादींवर एकूण सरपंचपदासाठी ३१ तर सदस्य पदासाठी २९२ अर्ज आॅनलाईन दाखल केले
आहेत.