वाडा पंचायत समितीला कम्युनिस्ट पक्षाचा घेराव
By admin | Published: January 4, 2017 04:56 AM2017-01-04T04:56:55+5:302017-01-04T04:56:55+5:30
तालुक्यातील शेला या गावच्या ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांकडे पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या सोमवार पासून सुरू केलेल्या उपोषणाची दखल
वाडा : तालुक्यातील शेला या गावच्या ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांकडे पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या सोमवार पासून सुरू केलेल्या उपोषणाची दखल न घेतल्याबद्दल कम्युनिस्टांनी वाडा पंचायत समितीला मंगळवारी घेराव घातला.
आपल्या मागण्यांसाठी या गावच्या ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र त्याची दखल प्रशासनाने न घेतल्याने उपोषण सुरूच असून उपोषणकर्त्या चार ग्रामस्थांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आठ दिवस उलटूनही प्रशासन ग्रामस्थांच्या मागण्याकडे गांभीर्याने बघत नसल्याच्या निषेधार्थ आज कम्युनिस्ट पक्षाने पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालून याचा जाब विचारला.
हे आंदोलन कम्युनिस्ट पक्षाचे वाडा तालुका सचिव सुनील धानवा यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले.
ग्रामपंचायतीने शेला गावठाण, घाटाळपाडा व मुकणेपाडा या गावासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणी पुरवठा योजना उभारली परंतु ही योजना गावापुरतीच राबविली आदिवासी पाड्यांना यातून वगळण्यात आले. तसेच घाटाळपाडा येथील विहीरीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. अशी अनेक कामे रखडली असून त्या विरोधात ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण आठव्या दिवशीही सुरू आहे.
(वार्ताहर)
- ग्रामस्थांच्या या उपोषणाची दखल कम्युनिस्ट पक्षाने घेऊन त्यांना पाठिंबा दिला. मात्र उपोषण कत्याची प्रकृती खाल्यावल्यानंतरही प्रशासन गांभीर्याने बघत नसल्याने याचा निषेध करण्यासाठी व ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी आज दुपारपासून वाडा पंचायत समिती कार्यालयाला घेराव घातला मात्र गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे या मिटींगसाठी बाहेर गेल्याने आंदोलन कर्त्यांना ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे घेराव आंदोलन सायंकाळ पर्यंत सुरूच आहे.