ढिसाळ नियोजनामुळे वाडेकरांचा श्वास कोंडतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:43 AM2017-11-06T03:43:59+5:302017-11-06T03:44:01+5:30
वाडा शहर झपाट्याने नागरीकरणाकडे विस्तारत असताना नागरी सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे. नागरिकांना स्वच्छतेचा प्रश्न अधिक भेडसावतोय.
वसंत भोईर
वाडा : वाडा शहर झपाट्याने नागरीकरणाकडे विस्तारत असताना नागरी सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे. नागरिकांना स्वच्छतेचा प्रश्न अधिक भेडसावतोय. शहराच्या मध्यवर्ती भागात जागोजागी कचरा साचल्याने नागरिकांना नाक मुठीत घेऊन चालावे लागतेय. सत्ताधाºयांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा जणू श्वासच कोंडतोय अशी परिस्थिती ओढवली आहे.
शहर वाढू लागल्याने कचरा निर्माण होण्याचं प्रमाण वाढू लागलं. हा संपूर्ण कचरा उचलून शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु यंत्रणा व मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने सकाळी कचरा उचलल्यनंतर पुन्हा काही तासात तसेच कचर्याचे ढिग निर्माण होतात. मार्केट परिसरात तर बकाल स्थिती बनली आहे. भाजीपाल्यापासून निर्माण होणाºया कचरा कुजल्याने प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागतो. रस्त्यावर मोकाट जनावरे कायम तळ ठोकून असल्याने या रस्त्याने चालत जाणे म्हणजे जीवावर बेतणारे आहे. या जनावरांमुळे येथून वाहने चालवणेही दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनले आहे. मुख्य रस्त्यावर वाचनालयालगत कचरा कायम असतो. तहसीलकडे जाणाºया रस्त्यावर साठलेल्या कचºयावर जनावरे कायम असल्याने वाहतूक कोंडी कायम होत असते. मुख्य बजारपेठेत निर्माण होणारा कचरा साठू नये यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या कचºयावर पोसल्या जाणाºया मोकाट जनावरांमुळे अनेकांच्या जीवावर बेतले. गेली दहा वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेना- भाजपच्या पदाधिकाºयांना स्वच्छतेच्या बाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याची बुद्धी सूचली नाही. शहरातून कचरा उचलायचा आणि गावाच्या वेशीवर टाकायचा यापलीकडे यांची स्वच्छतेची मोहीम गेली नाही.
स्वच्छता अभियानात हातात झाडू घेऊन मिरवणारे सरपंच - उपसरपंच प्रत्यक्ष गावाच्या स्वच्छतेच्या, मल:निस्सारणाच्या बाबतीत व कचरा व्यवस्थापनाबाबत कधी गंभीर राहिले नाहीत. डंपींग ग्राउंडच्या समस्येबाबत काही प्रयत्न झाले नाहीत. शहराच्या प्रवेशद्वारावरच डंपींग निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना करत लोकांना नाक मुठीत धरूनच येथून जावे लागतेय. तर कचºयाला लागलेल्या आगीमुळे प्रचंड धुराचे लोळ निर्माण झाल्याने अपघाताचा धोका संभवतोय. त्यामुळे कचºयाची समस्या एवढी गंभीर असताना पदाधिकाºयांनी मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने दिवसागणिक ही समस्या वाढू लागली आहे. ज्या कर्मचाºयांच्या जीवावर शहराची स्वच्छता अवलंबून आहे, त्या सफाई कर्मचाºयांना कोणत्याही सोयीसुविधा नाहीत.