कळंब पूल उदघाटनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:05 PM2019-11-20T23:05:24+5:302019-11-20T23:05:27+5:30
नागरिकांची होणार सोय; पूल पूर्ण होण्यास लागली सहा वर्षे
नालासोपारा : पश्चिमेकडील कळंब ते निर्मळ परिसराला जोडणाऱ्या नवीन पुलाचे काम तब्ब्ल सहा वर्षानंतर पूर्णत्वास आले असून आता हा पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. हा पूल नागरिकांसाठी लवकरच खुला होणार असून जुन्या पुलावरून होणाºया नागरिकांचा धोकादायक प्रवासाला पूर्णविराम लागणार आहे.
नालासोपारा पश्चिमेकडे कळंब हे समुद्र किनारा लाभलेले गाव आहे. येथे मुंबईहून मोठ्या संख्येने पर्यटक फिरायला येत असतात. या परिसरातील निर्मळ - कळंब परिसराला जोडणाºया जुन्या पुलाची दुरवस्था झाली असून तो धोकादायक झाला आहे. हा जुना पूल अरूंद असल्याने तसेच त्याचे कठडे देखील तुटल्याने वाहन चालवताना अंदाज येत नाही. यातूनच अनेकांचे अपघात झाल्याने त्याचाच बाजूला नवीन पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हाती घेण्यात आले होते.
या निर्मळ - कळंब परिसराला जोडणाºया नवीन पुलाच्या कामाची सुरवात २०१३ मध्ये करण्यात आली होती. २०१३ ते २०१९ च्या दरम्यान या पुलाच्या कामाला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. जुना पूल बिकट अवस्थेत असल्याने या पुलावरून प्रवास करणेही धोकादायक बनले आहे. तसेच बाहेरून कळंब परिसरात येणाºया पर्यटकांना जुन्या पुलाचा अंदाज येत नसल्याने अनेकवेळा अपघात होऊन वाहने पाण्यात पडली आहेत. पावसाळ्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास जुन्या पुलावरून पाणी जाते. त्यामुळे येथील परिसरातील जनजीवन विस्कळीत होत असल्याने नागरिकांनी नवीन पुलाची मागणी केली होती. पंरतु नवीन पुलाचे काम धिम्या गतीने सुरु होते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. या पुलाचे काम पूर्ण झाले असून हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले.
तब्बल सहा वर्षे या पुलाच्या बांधकामासाठी ठेकेदाराने घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र त्याचे काम पूर्ण झाले असल्याने आमच्यासाठी लवकरात लवकर खुला करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या पुलाचे काम पूर्ण झाले असून फक्त डांबरीकरणाचे काम बाकी आहे. आता त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले असून डिसेंबर महिन्याच्या शेवटी नागरिकांसाठी आणि वाहनांसाठी खुला करण्यात येईल.
-प्रशांत ठाकरे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वसई