कातकरी घरकुलाच्या प्रतीक्षेत; सात वर्षांपासून संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:52 PM2019-09-25T23:52:17+5:302019-09-25T23:52:21+5:30

जव्हार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा अनागोंदी कारभार

Waiting for the Katakari household | कातकरी घरकुलाच्या प्रतीक्षेत; सात वर्षांपासून संघर्ष

कातकरी घरकुलाच्या प्रतीक्षेत; सात वर्षांपासून संघर्ष

Next

- रवींद्र साळवे 

मोखाडा : तालुक्यातील पळसुंडा ग्रामपंचायतीतील कातकरी कुटुंब सात वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. २०११-१२ मध्ये गोपाळ बाळू वळवी, जनाबाई अशोक मिसाळ, सोपान गंगा वळवी या लाभार्थ्यांना जव्हार प्रकल्प कार्यालयाकडून घरकूल मंजूर झाली होती. ही घरकुले शूर झलकारी एकता महासंघ ठाणे यांच्या माध्यमातून बांधून दिली जाणार होती.

या घरकुलाबरोबरच १९३ मंजूर घरकुले बांधण्याचा ठेका देखील जव्हार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने शूर झलकारीला दिला होता. मात्र, हे काम अर्धवट राहिले. आणि यात नाहक अनेक कातकरी कुटुंबांचा बळी गेला. अनेकांची घरे अर्धवट राहिली. अनेकांना तर या योजनेची दमडीही मिळाली नाही. यामुळे आजही हे कातकरी कुटुंब निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत.

कुडामेडिच्या लहानशा झोपडीत वास्तव्य करणाºया या कुटुंबाची पावसाळ्यात मात्र अत्यंत बिकट परिस्थिती होते. झोपडीचं छत गळकं, कुड मोडलेत, जमीन ओली, यामुळे रहायचे कुठे, झोपायचे कुठे? अशा परिस्थितीत ऊन - पाऊस वारा थंडीमध्येही ही कुटुंबे जगत आहेत. या घरकुलांना प्रकल्प कार्यालयातून अनुदान दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. यानंतर अनेकवेळा या लाभार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयाचे उंबरठे झिजवले. परंतु प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने सात वर्षे होत आली तरी कुणी दखल घेत नाही.

माझ्या वडिलांना झोपडी मिळाली होती. त्यांच्या हयातीत काही ती तयार झाली नाही. आता माझ्या मुलाला देखील झोपडी मिळाली नाही. आम्ही कुडामेडीच्या झोपडीत रहातो. आता मतदानाच्या वेळेस आमच्याकडे मत मागायला आल्यावर आम्ही मृत आहोत असंच सांगणार. कारण आम्ही जिवंत असूनही कुणी आमच्याकडे लक्षच देत नाहीत, असे गंगाराम वळवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गेली अनेक दशके दारिद्र्यात खितपत पडलेला हा कातकरी समाज विकासापासून कोसो मैल दूर आहे.

मुंबईपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील कातकरी समाज मुलभूत सुविधांपासूनही वंचित आहे वर्षातील काही दिवस हातात काम असेल तेव्हा या वस्तीवर राहायचे. अन्यथा संसार पाठीवर घेऊन घरापासून काही किलोमीटर लांब वीटभट्टी किंवा शेतावर मजुरीचे काम करायचे. मिळेल ते खायचे, पुरेसे शिक्षण नाही, यामुळे आश्रमशाळा जवळ असलेल्या वस्त्यांवरील मुले कशीबशी पाचवीपर्यंत शिकू शकतात. आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या गावाबाहेर असलेल्या या पाड्यांना मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. मालकीची शेतजमीन नाही शिवाय उदरनिर्वाहचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने रोजगारासाठी कोसो दूर भटकंती करावी लागत आहे.

कातकरी म्हटले की, उन्हातान्हात मेहनत करणारे, अंगावर वीतभर वस्त्र असलेले आणि रानावनात भटकणारे बांधव डोळ्यांसमोर येतात. स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटूनही कातकऱ्यांबाबत हे चित्र तसेच आहे. देशातील मूळनिवासी आदिम जमात असणारा कातकरी समाज हा कायमच गावकुसा बाहेर राहिला. त्यांच्याकडे मालकीची जमीन नाही, शिक्षणाचा गंध नाही, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक तोकडे प्रयत्न झाले. विविध योजना सुरू झाल्या खºया, मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. आता तरी आमच्यापर्यंत किमान मूलभूत सोयीसुविधा पोहोचवा, अशी मागणी या समाजाने केली आहे.

यासंबंधातील माहिती तुम्हाला मोखाडा पंचायत समितीकडे मिळेल. ही माहिती त्यांच्याकडून घ्या.
- सौरभ कटियार
(प्रकल्प अधिकारी, जव्हार)

आम्ही घरकुलांचे लाभार्थी ठरलो. त्या ठेकेदाराने पाया बांधून दिला. त्यानंतर तो परत आलाच नाही आणि प्रकल्प कार्यालयात आमची कुणी घेत दाद घेत नाही.
- जनाबाई मिसाळ, वंचित लाभार्थी

Web Title: Waiting for the Katakari household

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.