घोटभर पाण्यासाठी जागोजागी विरा, बुडकी
By admin | Published: April 11, 2017 02:11 AM2017-04-11T02:11:19+5:302017-04-11T02:11:19+5:30
डहाणू तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी सरकारकडून कोणतीही योजना या भागामध्ये
- शौकत शेख, डहाणू
डहाणू तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी सरकारकडून कोणतीही योजना या भागामध्ये कार्यान्वित नसल्याने त्यांना विरा किंवा बुडकीवरच अवलंबून रहावे लागत आहे.
तालुक्यातून जाणारा मुंबई -अहमदाबाद हायवेच्या पूर्व व पश्चिम भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सरकारी योजनाच नसल्याने डोंगरकपाऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना घोटभर पाण्यासाठी नाला, ओहोळ किंवा उन्हाळ्यात सुकलेल्या नदीपात्रात स्वत: लाच खड्डे खोदावे लागत आहे. तसेच या खड्ड्यात जमलेले अशुद्ध पाणी त्यांना प्यावे लागते. या प्रकारालाच स्थानिक आदिवासींच्या बोली भाषेमध्ये विरा, बुडकी असे म्हणतात. शिसने, दिवशी, दाभाडी, किनदहवली, चळणी, सुसुखंडआंबा, धरमपूर, हळदपाडा, गांगणगाव, शिसने, आंबोली, चिंचले, कांदरवाडी, दह्याळे अशी तालुक्यातील ३० टक्के पेक्षा जास्त गावे आजही सरकारी योजनेविना स्वत: च आपल्याला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची सोय अर्थात विरा किंवा बुडकी खोदून करत आहेत.
सरकारी ठेकेदारांनी जंगल नष्ट केल्याने डोंगर उघडेबोडके झाल्याने दिवसेंदिवस भुगर्भातील पाण्याची पातळी खोल चालली असून डोंगरकपाऱ्यात, दऱ्याखोऱ्यात विहीर किंवा बोअरवेल खोदताना पाणी लागेलच याचा भरवसा नाही. सुर्या सारखी प्रत्येक वर्षी महापूर घेऊन येणारी नदी याच तालुक्यातून जाते.
शिसने डोंगरीपाडा, पाटीलपाडा या हजारा ते अडीच हजारपर्यंत लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये आदिवासी ग्रामपंचायती असल्याने त्यांचे वार्षिक उत्पन्न नगण्य आहे. त्यातच पाण्यासाठी सरकारी योजना राबवायची असल्यास १० टक्के रक्कम योजनेआधी भरायची अशी अट आहे. मात्र, सर्व ग्रामस्थ मिळूनही ही दहा टक्के रक्कम उभी करु शकत नाहीत, हे वास्तव माहित असल्याने ते देखील त्याचा आग्रह धरायला तयार नसतात. मात्र, सरकार दरबारी पिण्याच्या पाण्याची सोय असल्याची नोंद हमखास सापडेल. गेली ३३ वर्षे विधानसभेसाठी आदिवासीसाठी राखीव जागा आहे. त्यामध्ये सलग ३० वर्षे जे आमदार निवडून आले तेही आदिवासी समाजातील. मात्र तरीही येथील वणवण सुरूच आहे. निवडून आलेल्यांवर अन्य समाजाचे कायमच वर्चस्व राहिले असल्याने प्रथम शहरी भागासाठी पाण्याच्या योजना तयार झाल्या,आदिवासी पट्ट्यातील रहिवासी मात्र कायमच पाण्याविना राहिले.
मायबाप सरकारकडून पिण्याच्या पाण्याची सोय अध्याप झालेली नाही. त्यामुळे आम्हाला बुडकीतुनच पाणी प्यावे लगत आहे.
- शांताराम धांगडा,
ग्रामस्थ, शिसने