फादरवाडीमध्ये घराची भिंत कोसळली, वाहनांचे नुकसान, वृक्षही उन्मळून पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:03 AM2020-08-08T01:03:14+5:302020-08-08T01:03:44+5:30
वसई-विरार महापालिका : वाहनांचे नुकसान, वृक्षही उन्मळून पडले
वसई : चार दिवस पावसाने केलेल्या धुलाईमुळे वसई-विरारमध्ये ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. सोमवार ते गुरुवारपर्यंत ३६२ मिलीमीटर पाऊस झाला असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचे पत्रे, भिंतींची पडझड, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वसई पूर्वेतील फादरवाडीत एका घराची भिंत गुरुवारी रात्री कोसळली. तसेच मोठमोठे वृक्षही उन्मळून पडले आहेत. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या हालात आणखीनच भर पडली.
वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये वसई पूर्व-पश्चिम, नालासोपारा आणि विरार भागातील अनेक परिसर जलमय झाले होते तर या तिन्ही शहरांत गुरुवारी ३४ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर काहींच्या फांद्या तुटून पडल्या. नालासोपारा-आचोळे भागात आगीची एक घटना घडली, तर सहा सापही आढळून आले. वसई पूर्वेतील फादरवाडीत तबेल्याच्या बाजूला असलेल्या एका घराची भिंत कोसळली. शुक्रवारी सकाळी या ठिकाणी फायर इंजिन दाखल होऊन पाहणी केली असता बाजूच्या भिंती कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे आढळले. त्यामुळे या धोकादायक भिंतीही पाडण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांनी ‘लोकमत’ला दिली.