विटीदांडू हा खेळ प्रत्येक शाळेत पोहचवायचा आहे - विवेक कुवरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 12:42 AM2019-11-24T00:42:26+5:302019-11-24T00:42:45+5:30
पालघर जिल्ह्यात विटी दांडू या खेळाची मुहूर्तमेढ रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक विवेक कुवरा यांच्याशी केलेली बातचीत.
- खलील गिरकर
विटीदांडू हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाची २०१६ मध्ये पालघर जिल्हा असोसिएशनची स्थापना झाली. २०१९ मध्ये काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाºया राष्ट्रीय संघात या असोसिएशनचे सात खेळाडू होते. जिल्ह्यात या खेळाची मुहूर्तमेढ रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक विवेक कुवरा यांच्याशी केलेली बातचीत.
प्रश्न : विटीदांडू या खेळाची पालघर जिल्ह्यात मुहूर्तमेढ कशी रोवली गेली?
ग्रामीण भागात गावागावात हा खेळ मनोरंजनाकरिता खेळला जातो. मात्र हा स्पर्धात्मक पातळीवरचा सांघिक खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. हे २०१६ मध्ये समजले. डहाणू तालुक्यातील विजय गुहे ही व्यक्ती जालना येथे गेली होती. त्यांना या खेळाविषयी माहिती झाल्यानंतर त्यांनी तालुक्यात येऊन प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या स्नेह्यांकडून मला या खेळाची माहिती मिळाल्यानंतर याबाबत मी अध्यापन करीत असलेल्या कोसाबड येथील नूतन बाल शिक्षण संघाच्या अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना याकरिता विश्वासात घेऊन माहिती दिली. या खेळाचे सखोल ज्ञान आणि नियम समजून घेण्याकरिता जालन्याला जाऊन प्रशिक्षण घेतले.
प्रश्न: पहिल्यांदा खेळाडूंची प्रतिक्रि या कोणती होती?
या खेळाकरिता संघ बांधणी करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा विद्यार्थ्यांसमोर ठेवल्यावर काही मिनिटे हशा पिकला. अशा पद्धतीचा सांघिक खेळ असतो, याबाबत त्यांना विश्वास बसला नाही. या कामी नूतन बाल संघाच्या अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक आणि पदाधिकारी यांना विश्वासात घेतले. त्यांच्याकडून प्रतिसाद आल्यानंतर सरावाला सुरूवात झाली. खºयाअर्थाने ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या कर्मभूमीत या खेळाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
प्रश्न: स्पर्धात्मक प्रवास कसा सुरू झाला?
विद्यार्थी आणि पालकांना एकत्रित करून खेळाकरिता साहित्याची निर्मिती करून सरावही सुरू केला. मात्र प्रत्यक्षात सामान्यांचा अनुभव नसल्याने बहुचर्चित ‘लगान’ चित्रपटातील भुवन आणि खेळाडूंची जी मानसिक अवस्था दाखवली होती नेमका तोच अनुभव आम्ही घेतला. पहिल्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला आणि मुलींच्या संघाने प्रथम तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. जानेवारीत काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघाने सुवर्णपदक मिळविले.
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत हा खेळ पोहचवायचा आहे. शिवाय खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय संघाच्या निवडीकरिता तयार करताना प्रत्यक्ष सामन्यांचा अनुभव द्यायचा आहे. याकरिता योजना आखली आहे, परंतु निधीचा तुटवडा भासत आहे.