आदिवासींसाठी लढणारा योद्धा हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 05:18 AM2018-01-31T05:18:38+5:302018-01-31T05:18:43+5:30

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांच्या विरोधात भाजपा सरकार विरोधातच अनेकदा दंड थोपटणारे खा. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा योद्धा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

 Warrior fight for tribals | आदिवासींसाठी लढणारा योद्धा हरपला

आदिवासींसाठी लढणारा योद्धा हरपला

Next

पालघर : वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांच्या विरोधात भाजपा सरकार विरोधातच अनेकदा दंड थोपटणारे खा. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा योद्धा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. वनगा यांनी भूमीपुत्रांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
तलासरी तालुक्यातील कवाडा या अत्यंत दुर्गम आदिवासीबहुल पाड्यावर १ जून १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला. माजी खासदार व नायब राज्यपाल रामभाऊ कापसे, माधवराव काणे व प्रभाकर रेगे यांच्या तालमीत ते वाढले. त्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. मुंबई विद्यापीठातून बीए व त्यानंतर त्यांनी एलएलबी पूर्ण केले. १९७९ पासून त्यांनी वकिली सुरू केली. अ‍ॅड. श्रीनिवास मोडक यांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले. वकिली हा पेशा न ठेवता त्यांनी समाज बांधवांचे अनेक खटले मोफत लढविले. त्यांनी जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा, तलासरी, सिल्व्हासा येथील आदिवासींचे प्रश्न सोडविले. पुढे जव्हारला स्वत:चे कार्यालय स्थापून १९८० पासून स्वतंत्रपणे वकिलीला सुरूवात केली. त्यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालय ते मुंबई उच्च न्यायालय अशी १९८० ते ९६ पर्यंत वकिली केली.
खा. चिंतामण वनगा १९८२ ते ८४ भाजपचे जिल्हा चिटणीस तर १९८४ ते ८६ या काळात ते भाजपा युवा मोर्चाचे चे प्रदेश सचिव होते. १९८७ ते १९९० ते जव्हार तालुकाध्यक्ष होते. १९९५ पर्यंत ते भाजपाच्या आदिवासी आघाडीचे ते प्रदेशाध्यक्ष राहिले. पक्षाने त्यांना १९९७ साली भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त केले.

दिल्लीत मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

डॉ. राममनोहर लोहिया रूग्णालयात वनगा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. केंद्रीय परिवहन व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीशराजे अत्राम आदींनी श्रद्धांजली वाहिली.

वनगा हे नि:स्पृह, निस्वार्थी आणि समर्पित कार्यकर्ते होते. आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले होते.
- नितीन गडकरी,
केंद्रीय परिवहन मंत्री

त्यांच्या निधनाने आदिवासी समाजाचे मोठे नुकसान झाले. आम्ही एकत्र काम करायचो. वनवासी कल्याण आश्रमाच्या शाळा त्यांनी सुरु केल्या.
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री

१९९६ पासून माझा त्यांचा परिचय आहे. साधे आणि मनमिळावू नेते होते. मतदारसंघात केलेल्या कामाची पावती म्हणूनच ते तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकले.
- हंसराज अहिर, केंद्रीय गृहराज्य मंत्री

ंभाजपाने आदिवासी समाजाचा समर्पित सेवक आणि पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे.
- खा.रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा

Web Title:  Warrior fight for tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.