जव्हार तालुक्यातील पेरण्या वाया
By Admin | Published: June 20, 2017 06:39 AM2017-06-20T06:39:06+5:302017-06-20T06:42:15+5:30
पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यत दडी मारल्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच यंत्रांच्या नांगरीणीच्या युगात नंदनमाळ
हुसेन मेमन।
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यत दडी मारल्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच यंत्रांच्या नांगरीणीच्या युगात नंदनमाळ येथील शेतकरी मात्र गरीबीमुळे लाकडी नांगराचा वापर करीत आहेत.
जून च्या पाहिल्या आठवड्यात काही दिवस पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे भात, नागली, तुरी, वरी, उडीद, भुईमूग, हळद, याची लागवड केली, त्यानंतर त्याला लागणारे महागडे खतही विकत घेऊन शेतात टाकले आहे. परंतु पावसाने अचानक दडी मारल्यामुळे आणि येत्या काही दिवसांत पाऊस पडेल याचीही काही शाश्वती नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा जिल्हा बँक अडचणीत असल्याने व अन्य कुठून आर्थिक सहाय्य मिळालेले नसतांनाही शेतकऱ्यांनी अनेक लटपटी खटपटी करून नांगरणी, पेरणी केली, त्यासाठी महागडे मजूरही वापरले, मात्र गेल्या १८ ते २० दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे ते सारे फुकट गेल्याने शासनाने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेकडो शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, पं.स. कृषी विभागात नुकसान भरपाई करीता अर्ज करून त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केलेली आहे.
नंदनमाळ येथील १५ ते २० शेतकरी एकत्र येऊन दुसऱ्या पाड्यातील सुताराकडून नविन लाकडी नांगरणी अवजारे तयार करून शेतीची तयारी करीत असतात मोठी मेहनत घेऊन १२ ते १५ कि.मी. अंतरावर ही अवजड अवजारे डोक्यावर वाहून नेतात येथील गरीब आदिवासी जनतेला शेती शिवाय दुसार पर्याय नसल्यामुळे हंगामाच्या काळात भूमीहिन मजुरांना मोठी मागणी असते, मात्र शेतीचा हंगाम संपल्यानंतर त्यांच्या हाताला कामे नसल्यामुळे त्यांच्यापुढे स्थलांतर शिवाय पर्याय नसतो. ते विटभट्टी, बांधकाम व अन्य क्षेत्रात रोजगार शोधत असतात.