पांढऱ्या कांद्याने आणले यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
By admin | Published: April 10, 2017 05:15 AM2017-04-10T05:15:59+5:302017-04-10T05:15:59+5:30
रूचकर चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे नावारुपाला आलेला वाड्याचा पांढरा कांदा बाजारात येऊ लागला आहे
वसंत भोईर/वाडा
रूचकर चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे नावारुपाला आलेला वाड्याचा पांढरा कांदा बाजारात येऊ लागला आहे. मात्र यावर्षी त्याला योग्य भाव नसल्यामुळे नफा तर सोडाच पण झालेला खर्च वसूल होतो की नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत असून त्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधिले जाते. भातानंतर येथील शेतकरी कडधान्य, फळ, फुलांची शेती करीत आहेत. पूर्वी एकमेव भाताचे पिक घेतले जायचे. आता मात्र पांढ-या कांद्याला येथील हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी आता त्याची शेती करू लागले आहेत. चांबले, नेहरोली, बिलावली, डाकिवली, देवघर, कुडूस, गातेस, सांगे व नाणे या गावात पांढरा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भात शेती नंतर शेतीची नांगरणी करून ८.८ आकाराच्या कुंड्या तयार करून त्यावर कांद्याचे रोप लावले जाते. कांद्याला १० ते १२ दिवसातून पाणी दिले जाते. त्यामुळे कमी पाण्यात कांदा तयार होतो. त्यामुळे शेतक-यांनी त्याच्या लागवडीस पसंती दिली आहे. कांद्याला शेणखत, दाणेदार, १८:१८:१८ अशी खते दिली जातात. तर रोगाच्या संरक्षणासाठी किटक नाशके फवारली जातात. एका एकराला ६० हजारांचा खर्च येतो. यावर्षी थंडी पडल्यामुळे कांदा पिकावर परिणाम होऊन कांद्याची म्हणवी तशी वाढ झालेली नाही, अशी माहिती कुडूसचे शेतकरी शरद चौधरी यांनी दिली. मजुरीचे दर, औषधे, खते व यांत्रिक उपकरणे याचे दर वाढल्याने कांदा शेती परवडत नाही. असे शेतकरी सांगतात. पांढरा कांदा टिकावू असून साधारणपणे एक वर्षापर्यंत टिकतो त्यामुळे शेतकरी पांढ-या कांद्याची लागवड करत आहे. मात्र भाव नसल्यामुळे पांढरा कांद्याची शेती तोट्यात चालली आहे.