परतीच्या पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:39 AM2019-10-21T00:39:06+5:302019-10-21T06:15:13+5:30
वाडा तालुक्यात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असून या परतीच्या पावसाने शेतात कापून ठेवलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाडा : वाडा तालुक्यात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असून या परतीच्या पावसाने शेतात कापून ठेवलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून नेत असल्याने शेतकरी हवालिदल झाले असून त्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
वाडा तालुक्यातील वाडा कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. यंदा पाऊस समाधानकारक पडला असल्याने उत्पन्न चांगले आहे. मात्र, परतीच्या पावसाने हे सोन्यासारखे पीक उद्ध्वस्त केले आहे. दरम्यान, तीन - चार दिवसांपूर्वी कडक उन पडल्याने शेतकºयांनी जव्हार, मोखाडा येथून मजूर आणून भाताची कापणी सुरू केली होती. कापणी केलेल्या भाताचे कडपे दोन दिवस उन्हात सुकण्यासाठी ठेवले. मात्र, दोन दिवसांपासून रिमझीम पडत असलेल्या पावसाने ही रोपे भिजली असून काही ठिकाणी ती तरंगत आहेत. लोंगामधील भाताचे दाणे परिपक्व असल्याने या दाण्यांना शेतातच कोंब फुटू लागले आहेत.
परतीच्या पावसाने शेतकºयांचे मोठे नुकसान होत असताना प्रशासन निवडणुकीच्या कामात आहे. त्यामुळे या नुकसानीची दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांच्याशी संपर्क साधला असता मी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगून अधिक बोलणे टाळले.
अवकाळी पावसाने भातपिकांचे नुकसान
तलासरी : शुक्र वारी संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह तलासरी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने भात पिकाचे नुकसान झाले. शेतात भात पीक तयार झाल्याने शेतकºयांनी त्याची कापणी सुरू केली. कापलेले पीक शेतात सुकण्यासाठी ठेवले असता संध्याकाळी आलेल्या जोरदार पावसाने ते भिजून गेले.
गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला असला तरी संततधार पावसाने अनेक शेतकºयांचे भात पीक कुजून गेले. जे काही हाती राहिले आहे त्याची कापणी सुरू असतानाच परतीचा पाऊस जोरदार पडत असल्याने हे कापलेले पीकही वाया जात असल्याने भागातील शेतकरी हवालदील झाला आहे.
दरम्यान, या परतीचा पावसाचा फटका राजकरण्यांनाही बसतो आहे. दोन दिवसांवर मतदान आल्याने कार्यकर्ते दारोदारी मतदारांना भेटत आहे पण जोरदार पावसाने त्यांना प्रचारात अडचणी येत आहेत.