नायगावात पाणी झाले ‘कुलूप बंद, पाणीबाणीचा असाही परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:43 PM2018-10-23T23:43:42+5:302018-10-23T23:43:50+5:30
नायगाव पूर्व मधील गणेश नगर येथे सध्या पाणीबाणी सुरू आहे.
नालासोपारा : नायगाव पूर्व मधील गणेश नगर येथे सध्या पाणीबाणी सुरू आहे. पाणी जास्त मौल्यवान असून त्याच्या एका थेंबाचीही चोरी होवू नये याकरिता येथील रहिवासी पाण्याच्या पिंपांना कुलूप लावत असल्याचे आश्चर्यचकीत करणारे चित्र दिसून येत आहे. पाण्याची टंचाई आणि त्यात पाणी कमी पडू नये म्हणून ही उपाययोजना केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मौल्यवान वस्तू कोणी चोरून नेईल या भीतीने जशी कुलूपात सुरक्षित ठेवली जाते, बँकेच्या लॉकर्सचा आधारही घेतला जातो. त्याच रितीने आता नायगावमध्ये पाणी सांभाळण्यासाठी पिंपांना कुलूप लावले जात आहे.
याठिकाणी वसई विरार महापालिकेचे पाणी अद्याप आले नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा होत असतो. चाळीत प्रवेश करताच याठिकाणी पाण्याची मोठमोठी कुलूपबंद पिंपे ठेवलेली दिसतात. रात्री साडेआठ वाजता टँकर येताच पाणी भरण्याची धावपळ सुरु होते ते भरले की त्याला बाहेरून कुलूप ठोकले जाते. याठिकाणी चाळीत राहणाऱ्या रहिवाशांची सुमारे २५० हून अधिक पिंपे बाहेर असतात. बैठ्या चाळीतील घरांचे क्षेत्रफळ कमी असल्याने घराच्या समोर हीे पिंपे ठेवली जातात.
वसई विरार महापालिकेने या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु अनेक इमारती पाण्यावाचून आहेत. त्यामुळे टँकरचा पाणीपुरवठा या भागात होत असतो. एका टँकरसाठी १ हजार ते १५०० रुपये मोजावे लागतात. गणेश चाळीत देखील हीच परिस्थिती आहे.