उद्योगांची जलप्रदूषण तपासणी
By admin | Published: January 10, 2017 05:43 AM2017-01-10T05:43:06+5:302017-01-10T05:43:06+5:30
तारापूर एमआयडीसीतील उद्योग, सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) आणि पंप नं १, ३ व ४ मधील रासायनिक सांडपाण्याची विशेष तपासणी
पंकज राऊत / बोईसर
तारापूर एमआयडीसीतील उद्योग, सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) आणि पंप नं १, ३ व ४ मधील रासायनिक सांडपाण्याची विशेष तपासणी मोहीम शनिवारपासून सुरु करण्यांत आली असून ती १७ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. त्या करीता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विशेष पथक तारापूरला दाखल झाले आहे.
या औद्योगीक क्षेत्रातील सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्रात (२५ एमएलडी) क्षमतेपेक्षा अतिरिक्त येणारे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच सरळ नवापूरच्या समुद्रात सोडले जात असल्याने त्याचा गंभीर परिणाम मत्स्य उत्पादन व पर्यावर्णावर होत असल्याची याचिका भारतीय मांगेला समाज परीषदेने पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकाद्वारे जलप्रदूषणा च्या पातळीची तपासणी मोहीम हाती घेण्यांत आली होती.
त्या नुसार तारापूर औद्योगीकक्षेत्रात गतवर्षी २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या सहा दिवसात मोहीम राबवून सुमारे शंभर उद्योगांमधील रासायनिक सांडपाण्याचे नमूने घेऊन त्या मधील पीएच, सीओडी, बीओडी ची तारापूर येथील टी. ई. पी. एस. च्या प्रयोग शाळेत तपासणी केली असता त्या मध्ये जलप्रदुषणाचे प्रमाण जास्त आढळलेल्या तीस उद्योगांवर उत्पादन बंदीची कारवाई करण्यात आली होती. ते उद्योग आजही बंदच आहेत. तर आता नव्याने सुरु केलेल्या मोहिमेमुळे अजून काही उद्योगांवर बंदीची कारवाई होण्याची टांगती तलवार असून सध्या सुरु करण्यांत आलेल्या तपासणी मोहिमे दरम्यान, करवाई होऊ नये या भीतीने काही उद्योजक स्वत:हून तात्पुरते उत्पादन बंद किंवा कमी उत्पादन घेण्याची शक्यता आहे.
सहा आणि बारा तासांनी घेतलेल्या नमुन्यांची तपासणी
तारापूर एम आय डी सीमधील रासायनिक सांडपाण्याचा साठा करणाऱ्या पंप नं १, ३ व ४ तसेच सीईटीपी मधील इनलेट व आउटलेट तर मोठ्या उद्योगांच्या फक्त आउटलेटमधील सांडपाण्याचे नमूने दर सहा तासांनी तर मध्यम आणि छोट्या उद्योगांच्या आउटलेटमधील पाण्याचे नमुने दर १२ तासाने मंडळाचे १४ क्षेत्रीय अधिकारी घेणार असून ते तारापूर येथील प्रयोग शाळेत तपासले जातील.