बोईसर स्थानकात पाणी शुद्धीकरण यंत्रे दोन वर्षांपासून धूळखात
By admin | Published: November 22, 2015 12:08 AM2015-11-22T00:08:30+5:302015-11-22T00:08:30+5:30
बोईसर येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने तारापूर एमआयडीसीतील जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टील या उद्योगसमूहाने गेल्या वर्षी आठ
बोईसर : बोईसर येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने तारापूर एमआयडीसीतील जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टील या उद्योगसमूहाने गेल्या वर्षी आठ लाखांचे दोन आरओ बोईसर स्थानकात दिले. परंतु, त्यापैकी एक जेमतेम सुरू केला तर दुसरा तसाच धूळखात पडला आहे.
तारापूर अणुऊर्जा केंद्र, भाभा अणुसंशोधन केंद्र व तारापूर एमआयडीसी या मोठमोठाल्या प्रकल्पांमुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरू असते. हे लक्षात घेऊन त्यांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून जिंदाल स्टीलने ‘वॉटर लाइफ इंडिया’ या नामवंत कंपनीचे अनलिमिटेड क्षमतेचे फुली अॅटोमॅटीक दोन आरओ गेल्या वर्षी दिले. परंतु, सुरुवातीला दोन्ही आरओ लालफितीत अडकले होते. यातील पहिला आरओ चार ते पाच महिन्यांनंतर प्लॅटफॉर्म नंबर १ वर कार्यान्वित झाला. याला किमान दोन हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी लागते. तेवढी जागा प्लॅटफॉर्म नंबर दोनवर उपलब्ध नसल्याचे तसेच आणखी काही न पटणारी कारणे सांगून दुसरा आरओ अक्षरश: धूळखात पडला आहे. आता तर तो खालून गंजण्यासही सुरुवात झाली आहे. या आरओचे नळही चोरट्यांनी चोरून नेले आहेत. (वार्ताहर)