विक्रमगड तालुक्यातील पाणीटंचाई समस्या झाली गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 12:50 AM2021-03-11T00:50:32+5:302021-03-11T00:50:46+5:30
कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
राहुल वाडेकर
विक्रमगड : तालुक्यामधील अनेक गावपाड्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. काही भागांत मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून पाण्याची समस्या जाणवू लागली असल्याने या भागात टँकरचे प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहेत. दरवर्षी तालुक्यातील हजारो नागरिकांना पाणीटंचाईशी दोन हात करावे लागत असल्याने शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
विक्रमगड तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ असल्याने फेब्रुवारीनंतर तालुक्यातील काही गावपाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही पाणीटंचाई मार्चपासून ते पाऊस पडेपर्यंत कायम राहते. हक्काच्या पाण्यासाठी या भागात महिला संघर्ष करीत आहेत. विक्रमगड तालुक्यात सुमारे २८ गावपाड्यांना पाणीटंचाईचा दरवर्षी सामना करावा लागतो. या २८ गावपाड्यांमधून सुमारे ४० ते ५० हजार नागरिकांना दिवसाला जवळपास २५ टँकर लागत आहेत. तालुक्याचे प्रशासन या गावांमध्ये नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असले तरी यावर कायमचा तोडगा अजूनही निघालेला नाही. वास्तविक, तालुक्यामध्ये पाण्याचे मोठे स्रोत आहेत. सूर्या ही मोठा धरण प्रकल्प आहे. खांड लघुपाटबंधारा, मुहू खुर्द लघुपाटबंधारा, चार मोठ्या नद्या उपलब्ध असताना येथील गावांना पाणीटंचाई उद्भवत आहे, ही शोकांतिका असल्याचे सांगितले जाते. शासनामार्फत अनेक वेळा येथील पाणीटंचाईचा निपटारा करण्यासाठी मोठमोठ्या योजना प्रस्तावित केल्या होत्या, मात्र या योजना अजूनही कागदावरच लालफितीत अडकल्या आहेत. ज्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो अशी गावे डोंगराळ भागात असल्याने तेथे नळपाणीपुरवठा करणे सोपे नसले तरी या तालुक्यांमध्ये जलस्रोत टिकवून ठेवण्यासाठी छोटे-मोठे बंधारे बांधणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते.
तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीमुळे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असली तरी यावर शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. तालुक्यात पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. नदी-नाले यांच्यावर बंधारे बांधायला हवेत.
- डॉ. सिद्धार्थ सांबरे,
सामाजिक कार्यकर्ते
तालुक्यात अनेक पाणीपुरवठा योजना गेल्या ७-८ वर्षांपासून अपूर्ण आहेत. या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून चालू करायला हव्यात. तसेच तालुक्यातील अनेक गावांची वाढती लोकसंख्या बघता नवीन पाणीपुरवठा योजना राबवायला हव्यात.
- प्रमोद विश्वनाथ पाटील,
सदस्य - युवा प्रहार ग्रुप