विरारच्या काही भागांत पाणीटंचाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:26 AM2021-02-11T00:26:30+5:302021-02-11T00:26:47+5:30
चार दिवसाआड पाणी येत असल्याने महिलांमध्ये तीव्र संताप
विरार : मनवेलपाडा, कारगिल नगर, नाना-नानी पार्क आदी भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, चार दिवसाआड येणाऱ्या पाण्यामुळे महिला हैराण झाल्या आहेत. मात्र, महापालिकेकडून यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
मनवेलपाडा, कारगिल नगर, नाना-नानी पार्क आदी भागात मोठ्या प्रमाणात लोडबेअरिंग इमारती आणि चाळी आहेत. लाखो वस्तीच्या या भागात प्रत्येक चाळ किंवा इमारतीनुसार नळजोडण्या आहेत. काही चाळी किंवा इमारतींना तर अद्यापही नळजोडण्या मिळालेले नाहीत. परिणामी १०-१० रुम एका नळजोडणीवर अवलंबून असतात. यात एक तास पाणी येणार असेल तर या १० रुमना तितकी मिनिटे विभागून पाणी भरावे लागते. यामुळे महिलांचा बहुतांश वेळ हा पाणी भरण्यात जातो. कित्येक वेळा तर रात्री-अपरात्री पाणी सोडण्यात येत असल्याने महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
त्यातच आता गेला महिनाभर चार दिवसाआड पाणी येत असल्याने महिला प्रचंड त्रासल्या आहेत. यासंदर्भात येथील महिलांनी स्थानिक नगरसेवक व पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असली, तरी त्याबाबतचे योग्य उत्तर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, नालासोपारा-मोरेगाव येथील जलकुंभ व या जलकुंभापासून विविध ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांचे काम सुरू असून सर्व कामे पूर्ण होणार असल्याची माहिती दिली होती.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान योजनेंतर्गत वसई तालुक्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणारे जलकुंभ व या जलकुंभांपासून टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांच्या कामाचा आढावा वसई-विरार शहर महापालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, अमृत अभियान योजनेच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी घेण्यात आला होता. तर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत १४ पैकी ८ जलकुंभांचे काम करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिली होती.
...तर पालिकेवर हंडा-कळशी मोर्चा
विरार परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पाणीटंचाई-विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे.
येत्या आठ दिवसांत परिसरात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महानगरपालिकेवर
हंडा-कळशी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.