मोखाड्यात ८७ गावपाड्यांत पाणीटंचाई
By admin | Published: May 28, 2016 02:32 AM2016-05-28T02:32:03+5:302016-05-28T02:32:03+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदा मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील २७ गावे आणि ६० पाड्यांंना २२ टँकरने पाणीपुरवठा
- रवींद्र साळवे, मोखाडा
दरवर्षीप्रमाणे यंदा मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील २७ गावे आणि ६० पाड्यांंना २२ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या ८७ वर पोहोचली आहे.
टंचाईच्या या आकडेवारीमुळे १५७ पाडे, ५९ महसूल गावे असलेल्या मोखाडा तालुक्यात निम्म्यापेक्षा अधिक गावपाड्याची तहान टँकरच्या पाण्याने भागवली जात आहे. एकंदरच या चित्रामुळे प्रशासनाची पुरती फजिती झाली असून या
परिस्थितीमुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. गेल्या कित्येक वर्षापासून फे ब्रुवारी
ते जूनचा पहिला आठवडा या
काळात मोखाडा तालुक्यात पाणीटंचाई असते. केवळ टँकर लॉबीला जगण्यासाठी व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे येथील पाणीटंचाई नागरिकाची पाठ सोडायला तयार नाही.
मुळात मोखाडा तालुका दरीखोऱ्यात विखुरलेला आहे. यामुळे प्रशासनाने निश्चित केलेल्या पाणीपुरवठ्यापासून प्रत्यक्ष गावपाड्याचे अंतर २५ ते २६ किमीपेक्षा जास्त आहे. शिवाय आसे, स्वामीनगर ,कारेगाव, धामोडी या गावपाड्याची लोकसंख्या अधिक आहे. या गावांना एका टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी अर्धा दिवस तरी जातो.
गेल्या वर्षी पाऊस पडेपर्यंत टंचाईग्रस्त गावपाड्याची संख्या ७२ होती. यासाठी १७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदाची स्थिती अतिशय भयानक असून डिसेंबर संपताच पाणीटंचाईने वर तोंड काढून मे महिन्यात मात्र टंचाईग्रस्त गावपाड्याची संख्या ८७ वर पोहोचली आहे.
अशा प्रतिकूलतेमुळे एकीकडे प्रशासनाची धावपळ तर दुसरीकडे आदिवासींना अक्षरश: डोळ्यात तेल घालून टँकरची वाट बघत बसावं लागत आहे.