खासदार शेट्टींच्या दत्तक गावात पाण्यासाठी वणवण, महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 02:48 AM2019-03-22T02:48:27+5:302019-03-22T02:48:49+5:30
गो-हे या गावातील पाणीपुरवठा योजना तांत्रिक बिघाडामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याने येथील नागरिक पाणी समस्येने त्रस्त झाले असून गावातील महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
- वसंत भोईर
वाडा - तालुक्यातील गो-हे या गावातील पाणीपुरवठा योजना तांत्रिक बिघाडामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याने येथील नागरिक पाणी समस्येने त्रस्त झाले असून गावातील महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
या गावात जुन्या पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा होत असून ही पाणीपुरवठा योजना एक महिन्यापासून तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याने गावातील नागरिक व महिलांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. गावाच्या बाहेरील तीन विहिरीतून पाणी आणावे लागत आहे तर हे पाणी पिण्या योग्य नसल्याने पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
पाणी समस्येबाबत नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा या पाणी समस्येवर तोडगा निघत नसल्याने येथील महिलावर्ग वाडा येथील तहसिल कार्यालयावर हंडा मोर्च काढण्याच्या तयारीत आहेत.
गोºहे गाव हे आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार गोपाळ शेट्टी यांनी दत्तक घेतले असून गावाची २०११ च्या जनगणनेनुसार २३०० लोकसंख्या आहे तर आजमितीस ती चार हजारापर्यंत पोहचली आहे. गावासाठी एक कोटी ६५ लाख रुपये खर्चून सुमारे ८५ हजार लीटर क्षमतेची नवीन पाणी योजना तयार असून नवीन पाण्याची टाकी पाझरत आहे.
गेल्या महिन्यापासून आम्हाला या पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. बहुतांश महिला शेजारच्या कंपन्यांमध्ये कामानिमित्त जात असतात. त्यांना कामा व्यतिरिक्त घरदार सांभाळून पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे यावर लवकर उपाययोजना करून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा.
- कल्पना दडेकर,
ग्रामस्थ महिला, गोºहे.
नवीन पाणी योजनेसाठीच्या टाकीतून तात्पुरत्या स्वरूपात जुन्या टाकीत पाणी घेवून त्यातून गावात सुरळीत पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करणार आहोत. तसेच अपूर्ण असलेली नवीन पाणीपुरवठा योजना अभियंत्यांनी मान्यता दिल्या नंतर ताब्यात घेण्यासाठी लवकरच पाठपुरावा करू.
- रामचंद्र गणेशकर
सरपंच, गोे-हे ग्रामपंचायत.