वाडा तालुक्यात पाणीटंचाई?, नद्या आॅक्टोबरमध्येच कोरड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 12:06 AM2018-10-26T00:06:01+5:302018-10-26T00:06:15+5:30
पावसाने यावर्षी लवकरच दडी मारल्याने तालुक्यातील भातशेती मोठ्या संकटात आली आहे.
- वसंत भोईर
वाडा : पावसाने यावर्षी लवकरच दडी मारल्याने तालुक्यातील भातशेती मोठ्या संकटात आली आहे. यासाठीच तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी वाडा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. यादरम्यान तालुक्यातील नद्यांवर जे बंधारे आहेत ते तात्काळ बंद करा अशी मागणी करण्यात आल्यानंतर प्रशासन कामाला लागले असून तात्काळ बंधारे बंद करून पाणी अडवायला सुरु वात केली आहे.
किमान नद्यांमध्ये असलेला पाणीसाठा शाबूत राहावा यासाठी नद्यांवर असलेले बंधारे बंद करा. अशी मागणी शेतकºयांनी केल्यानंतर प्रशासनाने आब्जे, पाली अशा विविध ठिकाणी असलेले बंधारे बंद करायला सुरुवात केली आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने नद्यांमधून वाहणारे पाणी कमी झाले होते. मात्र, असे असूनही जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने आणि लघु पाठबंधारे विभागाने वेळीच लक्ष न दिल्यामुळे आज बंधारे पूर्ण भरतात की नाही हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे यावर्षी बंधाºयांमधील पाण्याची पातळी अतिशय कमी आहे. पिंजाळ व वैतरणा नदीत तर काही दिवसात खडखडाट होईल अशी चिंता काही शेतकºयांनी व्यक्त केली असून पिकांच्या विनाशानंतर आता पाणीबाणी हे नवे आव्हान लोकांना सोसावे लागणार असेच दिसत आहे.
>प्रशासनाला गांभीर्यच नाही
वाडा तालुक्यातून वैतरणा, पिंजाळ, तानसा व देहर्जे या चार नद्या वाहत असून त्यावर जागोजागी लहानमोठे बंधारे आहेत. खर तर हे बंधारे नीट व वेळेत बंद केले तर तालुक्यातील निम्म्याहून अधिक पाणीसंकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही मात्र दुर्दैवाने प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याने नद्यांचे पाणी वाहून जाते.पावसाने गेल्या अडीच महिन्यांपासून पाठ फिरवल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच मात्र परतीच्या पावसानेही दगा दिल्याने तालुक्यातील नद्यांमधील पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात कमी झाला असून सात महिने टिकेल इतका पाणीसाठा नद्यांमध्ये उरलेला नाही.