जव्हार शहरातील प्रभाग ३ मध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 12:09 AM2021-01-10T00:09:08+5:302021-01-10T00:09:15+5:30

पाणी सुविधेसाठी कुटुंबांनी केली मागणी : टँकरने भरावे लागते पाणी

Water shortage in ward 3 of Jawahar city | जव्हार शहरातील प्रभाग ३ मध्ये पाणीटंचाई

जव्हार शहरातील प्रभाग ३ मध्ये पाणीटंचाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये पाणीपुरवठ्याची भीषण समस्या आहे. येथील नागरिकांना टँकरने पाणी भरावे लागत आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिकांना पाणी भरून ओसंडून वाहत असून पिण्याच्या पाण्याने गाड्या धुतल्या जात आहेत. याबाबत नगर परिषद प्रशासनाचा पाणीपुरवठा विभाग निष्काळजीपणा दाखवत असल्याचा आराेप रहिवाशांकडून हाेत आहे.

नगर परिषदेचे पाणीपुरवठा विभागप्रमुख विशाल मोरे यांच्या निदर्शनास हा बेजबाबदारपणा आणूनही संबंधितांवर कारवाई केलेली नाही. या भागातील कुटुंबांना पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा प्रशासनाने मुख्य पाइपलाइनवरून एक-दीड इंचाची खास पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले आहे, पण हे काम अतिशय धिम्या गतीने होत आहे. तीन दिवसांपासून पाइपलाइन टाकण्याचे काम बंद आहे. शिवाय, खडखड नळपाणी योजनेचे खोदण्याचे काम सुरू असल्याने या भागात नगर परिषद यांच्याकडून टँकरद्वारे होत असलेला पाणीपुरवठाही बंद केला आहे. पाणीपट्टी कर भरूनही तीन वर्षांपासून या नागरिकांना पाणी मिळत नाही. दलित वस्ती सुधार योजनेतून सुमारे ४३ लाख रुपये खर्च केले आहेत. पण, पाण्यासाठी तरतूद केलेली नाही. ठेकेदाराच्या फायद्यासाठी प्रशासनाने हा निधी खर्च केल्याचा आराेप हाेत आहे. येथील महिलांना टँकरमधून पाणी भरावे लागत आहे.
 

नगर परिषद पाणीपुरवठा विभागाने जनजागृती करून पाण्याचे महत्त्व समजावून द्यायला हवे. शिवाय ज्या कुटुंबांना पाणी येत नाही, त्यांना पाणी मिळावे यासाठी नवीन पाइपलाइनचे निर्देश देण्यात आले आहेत.
- विशाखा अहिरे, स्थानिक नगरसेविका
 

जे नागरिक पाण्याचा अपव्यय करताना आढळले आहेत त्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. पुन्हा असे कृत्य करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- विशाल मोरे, अभियंता, 
पाणीपुरवठा विभाग, जव्हार नगर परिषद

Web Title: Water shortage in ward 3 of Jawahar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.