पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची ठेकेदारांशी भागीदारी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 05:54 AM2019-05-28T05:54:40+5:302019-05-28T05:54:43+5:30
पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेच ठेकेदारांच्या भागीदारीत कामे करीत असून यामुळे कामांचा निकृष्ट होत आहे.
जव्हार : पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेच ठेकेदारांच्या भागीदारीत कामे करीत असून यामुळे कामांचा निकृष्ट होत आहे.
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत रामखिंड येथील जलयुक्त शिवार योजनेतून महिनाभरापूर्वी बांधलेली विहीर कोसळल्याने कामांचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. या कोसळलेल्या विहिरीचे काम तात्काळ सुरु करण्यात आले खरे, मात्र पालघर जिल्ह्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील हे अधिकारी काही मोजक्या ठेकेदारांना हाताशी धरून संगनमताने भागीदारीत ठेकेदारी करीत आहेत.
जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील जवळपास अनेक कामे ही नाशिक येथील ठेकेदार मितेश पारेख यांना मिळत असून, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील हे सर्वच कामांची टेंडर्स मॅनेज करून देत आहेत. अभियंता व मितेश पारीख यांच्या संगमताने ठेकेदारीमुळे लाखोंची अनेक अनावश्यक कामे ही केली जात आहेत. ठेकेदार व अधिकारी मिळून कामे करीत असल्याने बोगस कामांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य सुधाकर वळे यांनी केली अहे.
>आम्ही पारेखच्या भागीदारीत कुठलीही कामे करीत नाही. काही ठेकेदार असून,त्यांनी हा मॅसेज जाणूनबुजुन पसरवला आहे.
महेश पाटील, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग पालघर